प्रतिनिधी -स्वप्नील कदम
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मोक्का गुन्ह्यासह तब्बल ५३ गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी जेरबंद करून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
या संदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले या प्रकरणी अरमान प्रल्हाद नानावत ( वय. २४, रा. वढु खुर्द, ता. हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. त्याला १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी, जबरी चोरीच्या तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेण्या बाबत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. अरमान नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणचे पोलीस शोध घेत होते. तो वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अरमान नानावत याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती हस्तगत करून आरोपीचे दिनक्रम माहिती करून घेतला. अरमान नानावत हा स्पोर्ट बाईकचा वापर करून गुन्हे करतो. मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करत असल्याने सकाळी पुणे जिल्हयात असे तर रात्री गुजरात मध्ये तर कधी मध्यप्रदेश मध्ये मुक्काम करायचा. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सलग १३ दिवस पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले. अरमान नानावत हा कोरेगाव भिमा परीसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्यास सापळा रचून ताब्यात घेतले.
अरमान नानावत त्याच्याकडे तपास केला असता त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरुर शहरात दोन महिलांच्या गळयातील दागिने जबरीने ओढून मोटार सायकल वरून पळून गेला असल्याचे सांगितले. हे दोन्ही गुन्हे शिरूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या कडून एक लाख रुपयांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
अरमान नानावत हा हिंजवडी, सांगवी, तळेगाव दाभाडे, पौड, घोडेगाव, वडगाव मावळ, कामशेत, दिघी, पिंपरी, शिक्रापुर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकुण ५३ गुन्ह्यात हवा आहे.
हि कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, हवालदार विजय कांचन, राजु मोमीन, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, निलेश सुपेकर, प्रमोद नवले, दगडू विरकर यांनी केली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.