पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पुण्यातील खडक पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या सततच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न झाल्यानंतर सुनेचा सासूशी होणारा वाद काही नवीन नसतो, परंतु सासूचे टोमणे आणि छळ टोकाला गेले, की याचे परिणाम काहीही होऊ शकतात. असाच प्रकार खडक पोलीस स्टेशन परिसरात घडला आहे. खडक पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या सततच्या छळाला कंटाळून त्रास सहन न झाल्यामुळे विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.
सायली सौरभ भागवत (वय 22, रा. दत्तवाडी, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे तर राजेश्री राजेंद्र भागवत असे सासूचं नाव आहे. रवी अनिल अहिरे ( वय 39, रा, हिराबाग पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू राजेश्री राजेंद्र भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायली सौरभ भागवत हिचा राजश्री राजेंद्र भागवत हिच्या मुलाशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासू राजश्री ही सायली हिला सतत टोमणे देऊन तिचा मानसिक छळ करायची. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खालच्या पातळीचे शब्द वापरून नेहमीच त्रास देत होती असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सुनेला तीने उपाशी पोटी ठेऊन, तिच्या नवऱ्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले. तसेच तिला रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर हाकलून दिले. या जाचाला कंटाळून सायली हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप सायलीच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस एल एन सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.