पुणेहडपसर

कर्मवीर भाऊराव पाटील.

महाराष्ट्र हा दगड धोंड्यांचा देश. अंजन कांचन कडे कपाऱ्यांचा देश. भले रत्नांची खाण या मातीत नसेलही ,पण
नररत्नांची खाण मात्र या महाराष्ट्रात निश्चितच आहे. त्यापैकीच एक देदीप्यमान रत्न म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. भव्य देहयष्टी, छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व, असे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व.
100 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारे ,ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रभर अनवानी फिरून कर्मवीर भाऊरावांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे कार्य केले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते , हे कर्मवीरांना ठाऊक होते .

 

बहुजन ,गोरगरिबांच्या मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारा देवमाणूस कर्मवीर भाऊराव पाटील एकीकडे आणि आताचे सगळे शिक्षण सम्राट एकीकडे. कर्मवीर ही उपाधी त्यांच्या कामातून लोकांनी त्यांना बहाल केली. एक वेळ जन्मदात्या पित्याचे नाव बदलीन पण वसतिगृहाला दिलेले शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे विरळाच.
कोल्हापूर जिल्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेला आणि कार्याने प्रगतीपथावर गेलेला जिल्हा. याच जिल्ह्यातील कुंभोज गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील कारकून होते. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण विटे, दहिवडी अशा वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी झाले. 1902 ते 1907 यावर्षी कोल्हापूरच्या राजापूर हायस्कूलमध्ये ते शिकले. अभ्यासापेक्षाही ते कुस्ती ,पोहणे, मल्लखांब या क्रीडा प्रकारात तरबेज होते. ते इंग्रजी सहावी पर्यंत शिकले होते. शाळेत फार शिकता जरी आले नाही तरी समाजाच्या शाळेत खऱ्या अर्थाने ते शिकले, माणसाचं आणि परिस्थितीचं त्यांनी वाचन केलं.

 

तेव्हाचे इंग्रजी सहावी म्हणजे आत्ताचे दहावी शिक्षण असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली .अनेक विद्यापीठांनाही लाजवेल अशा पदव्या आणि उपाध्या त्यांनी आपल्या कामातून मिळवल्या. 4 ऑक्टोबर 1919 रोजी भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली .आज महाराष्ट्रातील 14 जिल्हे आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष पसरला आहे .आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था ओळखली जाते. संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे.
स्वतःची शेती असणारा शेतकरी म्हणजे रयत ,आणि रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणून संस्थेला रयत शिक्षण संस्था हे नाव दिले. श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्त्वांवर शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला आहे. संस्थेच्या या कार्यात कर्मवीर भाऊराव पाटलांची पत्नी लक्ष्मीबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महात्मा गांधी यांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव होता.

 

1910 पासून कर्मवीर भाऊरावांनी खादीचे व्रत स्वीकारले व अखेर पर्यंत त्याचे पालन केले .पुणे विद्यापीठ म्हणजेच सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भाऊरावांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी डि.लीट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली. भारत सरकारने 26 जानेवारी 1959 ला कर्मवीर भाऊराव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तेव्हा भाऊराव म्हणाले होते, मला जनता जनार्दनाने दिलेली कर्मवीर ही पदवी त्याहून श्रेष्ठ आहे. ते आपल्या नावाखाली रयतसेवक अशी पदवी लावत.
मला लाख रुपये देणारा एक व्यक्ती नको, तर एक रुपये देणारी लाख माणसं हवीत, असा दृष्टी असा नवदृष्टिकोन असणारा द्रष्टा विचारवंत म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय .

 

9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले शंभर ते दीडशे वर्षात भाऊरावांसारखा शिक्षण महर्षी जन्माला आला नाही. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कर्मवीरां विषयी म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली. महात्मा गांधींनी ही सातारा येथे भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहास भेट दिली होती. वसतिगृह पाहून ते म्हणाले होते, भाऊराव मी साबरमती आश्रमात जे करू शकलो नाही तो चमत्कार तुम्ही येथे केलात. माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणतात कर्मवीरांनी शिक्षणाचा नवीन पायंडा सुरू करून आधुनिक महाराष्ट्र घडवला .
136 व्या जयंतीनिमित्त या आधुनिक शिक्षण महर्षी,ज्ञान भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना भावपूर्ण शब्दांजली

शब्दांकन
प्राचार्य दत्तात्रय जाधव
साधना विद्यालय हडपसर,पुणे 28.