पुणे, दि. 26 ः मोबाईल हँडसेट चोरी करणाऱ्या झारखंडमधील टोळीचा हडपसर पोलिसांनी पर्दापाश केला. आरोपीकडून 16 लाख रुपयांचे 52 मोबाईल जप्त केले. श्यामकुमार संजय राम (वय 25), विशालकुमार गंगा महातो (वय 21) बादलकुमार मोतीलाल महातो (वय 25), विकीकुमार गंगा महातो ऊर्फ बादशाह नोनीया (वय 19, सर्व रा. तीनपहाड, नया टोला, पंचायत भवन, ठाणा राजमहल, जि. सायबगंज, झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, गोपी महातो आणि राहुल महातो (रा. तिनपहाट, सायबगंज, झारखंड) फरार झाले असून, पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मोबाईल चोरी करणारी टोळी हडपसर गाडीतळ परिसरात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी मंडई, चित्रा चौक, भाजी मंडई, पुणे शहरातील विविध ठिकाणी हातचलाखीने मोबाईल चोरी करीत असल्याची आरोपीने कबुली दिली. आरोपी विकीकुमार गंगा महातो ऊर्फ बादशाह नोनीया याच्यावर अनुमंडल राजमहल येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा, तर विशालकुमार गंगा महातो याच्यावर मोबाईल चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आणले असून, 16 लाख रुपयांचे 52 मोबाईल हँडसेट जप्त केले असून, मागिल दोन दिवसांत हडपसर पोलिसांनी 72 मोबाईल हँडसेट जप्त करीत नऊ परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पूनम काळे, प्रतिक माने यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.