पुणे, दि. 30 ः महिला-मुलींची छेडछाड, वाहतूककोंडी आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका उत्साहात आणि शांततेत होण्यासाठी पोलीस मदत केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन, विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ), वाहतूक नियोजनासाठी बॅरिगेट्स, साध्या गणवेषातील पोलीस अधिकारी-कर्मचारी असे योग्य नियोजन केले. नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळे गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत झाल्याचे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
हडपसर, ससाणेनगर, काळेपडळ भागातील गणपती मंडळे आकर्षक देखावे, विद्युत रोशनाई पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. ससाणेनगर परिसर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये वाहतूककोंडीचा प्रश्न दरवर्षी निर्माण होत असतो. यावर्षी वाहतूक पोलीस आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य नियोजन केल्यामुळे विनाअडथळा गणेशोत्सव झाल्याचे अशोक जाधव, दिलीप गायकवाड, मुकेश वाडकर यांनी सांगितले.
वाहतूक विभागाच्या ससाणेनगरमधील नवनाथ चौक येथे पोलीस मदत केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरा, व्हॅन, विशेष पोलीस अधिकारी, बॅरिकेट्स, साध्या गणवेषातील पोलीस अधिकारी-कर्मचारी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी अशोक जाधव यांनी सांगितले.
ससाणेनगर येथील कालव्यावरील विसर्जन घाटावर बॅरिगेट्स लावून स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. विसर्जन घाटावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे गणेशभक्त आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.
दरम्यान, श्रींची मूर्ती संकलन, दान, निर्माल्य कलश, कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि फिरते हौद अशी सुविधा पालिका प्रशसानाच्या वतीने केली होती. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी सांगितले.
हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांची उत्तम सहकार्य केल्याचे यावेळी डगळे यांनी स्पष्ट केले.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले की, चार पोलीस निरीक्षक, 25 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 150 पोलीस अंमलदार, पाच होमगार्ड, 20 पोलीस मित्र (एसपीओ) यांनी गणेशोत्सवामध्ये विशेष कामगिरी केली.