पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पोलिसांविरोधात तक्रारदार अर्ज दिल्यानंतर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशीसाठी बोलावलेल्या दोन महिलांनी थेट सहाय्यक पोलीस आयुक्तांचा दुचाकीवरून पाठलाग करीत त्यांची पोलीस गाडी भररस्त्यात अडवत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा भागात घडला. सहाय्यक आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यालाच हा अनुभव आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 24 व 25 वर्षीय महिलांविरोधात सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी 332 व 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार तौसीफ सय्यद (वय 29) यांनीयेरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे.
रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पानटपरी सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पानटपरी आहे. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नाईट राऊंडच्या अधिकारी उपनिरीक्षक संदीप करपे व प्रोबेश्नरी उपनिरीक्षक अविनाश शेवाळे यांनी बंद करण्यास सांगितले होते. तेव्हा महिलेने गोंधळ घातला. तसेच, त्यांच्याच विरोधात अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. महिलेचा सातत्याने जबाबात बदल करत होत्या. त्यामुळे अप्पर पोलीस आयुक्तांनी हा अर्ज येरवडा विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्याकडे तपासासाठी दिला होता. या अर्जाच्या चौकशीकामी 14 ऑक्टोंबर रोजी महिलांना बोलवण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशी सुरू केल्यानंतर त्यांना जबाब नोंदवण्यासाठी काम सुरू केले. महिला सतत पतीला फोन करून बोलत होती व जबाबात बदल करत होती. तसेच, तिने दिलेला जबाब पाटील यांनी घेतला असता तिने तो परत मिळविला.
ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तर विचारलेल्या प्रश्नाचीही उत्तरे देत नव्हती. तसेच प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी वेळ घेत होती. दरम्यान, पाटील यांना भारत व पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त असल्याने ते बंदोबस्तासाठी निघाले.परंतु त्या दोन महिलांनी सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची गाडी भररस्त्यात अडवली आणि , माझा जबाब तुम्ही आताच घ्या, तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा आहे का, असे म्हणत वाद घातला. तसेच, ते गाडीवरून उतरले असता त्यांना धक्काबुक्की केली. ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.