हडपसर, दि. 25 ः शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जागृती केली, तर ती थेट पालकांपर्यंत पोहोचते. पालक विद्यार्थ्यांचे ऐकतात, ही बाब लक्षात आली, त्यासाठी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून वाहतुकीचे नियमन याविषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मद्यपि, हेल्मेट, सीटबेल्ट, ट्रिपलसीट, विरुद्ध दिशेने वाहने दामटणे, अशा विविध विषयांवर नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अपघात होऊन मोठी दुर्घटनेचे चित्र विद्यार्थ्यांनी साकारल्याचे हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सांगितले.
हडपसर-गाडीतळ येथील साध्वी सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन शाळा क्र.4मध्ये हडपसर वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक नियमन याविषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये चौथी ते आठवीमधील 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना शिक्षक आनंदराव लकडे, बाळकृष्ण चोरमले, अनिता जाधव, वंदना जाधव, मालन कुचेकर, सुलताना मण्यार, ज्योती ननवरे, अशोक दगडे, दत्तात्रय मुळीक यांनी मार्गदर्शन केले.
कदम म्हणाले की, शाळांना सुटी असेल तर वाहतूक सुरळीत राहते. त्यामागची कारणमिमांसा शोधली, त्यावेळी लक्षात आले की, अनेक पालक नियमांचे उल्लंघन करून पाल्याला शाळेत सोडवतात, स्कूल बस, रिक्षा, व्हॅन रस्त्यात उभ्या राहतात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे तुमच्यासह सर्वच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो, त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी मांडले.
मुख्याध्यापिका संगीता डांगे यांनी प्रास्ताविक केले. बाळकृष्ण चोरमले यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव लकडे यांनी आभार मानले.