पुणेमहाराष्ट्र

नागरिकांमध्ये संरक्षण क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण व्हायला हवी – एअर मार्शल हेमंत भागवत

पुणे, दि. २६ नोव्हें. – राष्ट्राची प्रगती सर्व प्रकारच्या संरक्षण व्यवस्था आणि नागरिकांची कर्तव्ये यावर अवलंबून आहे. त्यासाठी समाजात संरक्षण क्षेत्राची जागरूकता वाढली पाहिजे, असे प्रतिपादन एअर मार्शल हेमंत भागवत यांनी आज येथे केले. उद्योग अनुभव प्रतिष्ठानच्यावतीने उद्योगभूषण व उद्योगदीप्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले, तेंव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चितळे डेअरीचे गिरीश चितळे होते तर व्यासपीठावर पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, पुणे शाखेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष विकास दांगट व संस्थापिका श्वेता गानू उपस्थित होत्या. पुरस्काराचे यंदाचे १० वे वर्ष होते.

यावेळी बोलताना भागवत पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात संरक्षण बाबतीत भारत अव्वल झाला आहे. मात्र नागरिकांमध्ये संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी, डोळस वृत्तीने पहायला हवे. आपल्याला अधिकार आणि हक्कांची जाणीव असते, मात्र कर्तव्य आणि जबाबदारी याचा विसर पडतो, हे बदलायला हवे. आपल्या शाश्वत मूल्यांना अबाधित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. परकीय आक्रमणे लक्षात घेता आपली संरक्षण सिद्धता अजूनही वाढवायला हवी आहे. सबळ राष्ट्र होण्यासाठी पुढची १०-१५ वर्षे खूप महत्वाची आहेत.

 

यावर्षीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे प्रदान केले गेले – उद्योगभूषण प्रथम पुरस्कार – मारुती पवार (अ‍ॅम्पट्रॉनिक्स टेक्नो, खोपोली), द्वितीय पुरस्कार – विनोद सातव (लीड मिडीया अँड पब्लिसिटी, पुणे), लघु व मध्यम उद्योगभूषण प्रथम पुरस्कार – रवींद्र नाकिल (स्काय इंडस्ट्रीय, इचलकरंजी), द्वितीय पुरस्कार – संजय खरे (स्व टेक्नॉलॉजिस, नवी मुंबई), उद्योगदीप्ती पुरस्कार – भक्ती मायाळू (सिने-नाट्य संपादिका, निर्माती), उद्योगदीप्ती दिव्यांग पुरस्कार – अनघा मोडक (आकाशवाणी निवेदिका), उद्योगदीप्ती स्टार्टअप पुरस्कार – ऋतिका वाळंबे (पुस्तकवाले, पुणे) व उद्योगदीप्ती अनिवासी भारतीय पुरस्कार – पुर्णिमा कर्‍हाडे (साऊलफुडस्, अमेरिका) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी ॲड. सुभाष मोहिते, रवींद्र प्रभुदेसाई, विकास दांगट आणि श्‍वेता गानू यांचीही मनोगते झाली. यावेळी प्रतिष्ठानच्या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी जोशी यांनी केले तर हर्षल गरगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.