पत्रकारांसाठी पतंसस्था स्थापन करण्याचा मानस – मधुसुदन कुलथे
पुणे, दि. 27 ः वृत्तपत्रांमध्ये अर्धवेळ, अंशतः यूट्यूब, पोर्टलमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना शासन दरबारी असली पाहिजे. त्याबरोबर त्यांना अडचणीच्या काळात तातडीची मदत करता यावी, यासाठी पतसंस्था स्थापन करण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसुदन कुलथे यांनी सांगितले.
वाघोली (ता. हवेली) येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रची बैठक आयोजित केली होती. यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पुणे महानगराध्यक्ष अशोक बालगुडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी विजयराव लोखंडे, जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील, जिल्हा मुख्य संपर्कप्रमुख प्रीती पाठक, पूर्व विभाग अध्यक्ष नितीन करडे, मुख्य संघटक संभाजी चौधरी, मुख्य सचिव साहेबराव आव्हाळे, मुख्य कार्याध्यक्ष गौतम पिसे यांची निवड जाहीर करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलथे म्हणाले की, पत्रकार भवन, शासन दरबारी पत्रकारांची नोंद, तसेच पत्रकारांची पतसंस्था असली पाहिजे. संघटनेत काम करत असताना प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत. पद फक्त नामधारी नाही, तर ती तुमच्यावर टाकलेली मोठी जबाबदारी आहे, याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बालगुडे म्हणाले की, बातमी देताना पत्रकारांनी अलिखित नियमावली ठरविली पाहिजे. कोणावरही टीका-टिपण्णी करताना त्याच्याही दोन ओळी मांडाव्यात. आकसापोटी बातमी देऊ नये, ओळखपत्र असले पाहिजे. मात्र, स्वतःची वेगळी ओळख लेखणीच्या माध्यमातून केली, तर कोणाही पत्रकारावर हल्ले होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.