पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : रुबी हॉल रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी HR प्रमुखासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिताली आचार्य वय वर्ष 42, रा. कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 31 ऑक्टोबर रोजी मिताली यांनी रुग्णालयामध्येच आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुचिता योगेश आचार्य (वय वर्ष 78 रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुचिता आचार्य यांची सून मिताली आचार्य या मागील 17 वर्षांपासून रुग्णालयामध्ये काम करत होत्या. आरोपी महिला तिला किरकोळ कारणावरून स्टाफसमोर टोचून बोलत असत, तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक देत असत. याबाबत मितालीने हॉस्पिटलचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनीही तिला अपमानास्पद वागणूक देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यानंतर मिताली आचार्य या नोकरीसाठी लेखी अर्ज घेऊन गेल्या असता, HR ने ‘मी दुसऱ्या कोणालाही नोकरी देईन पण तुला नोकरी देणार नाही,’ असे बोलून मितालीच्या अंगावर अर्ज फेकून दिला होता.एवढा मोठा अपमान सहन न झाल्यामुळे मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.