लोणी काळभोर (स्वप्निल आप्पा कदम)
लोणी काळभोर व महामार्गावर रस्त्यावर सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत, या वाहतूककोंडीत अडकल्यामुळे वेळेवर उपचार न झाल्याने उपचाराअभावी महिलेचा अंत झाला, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ही महिला ठरली त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
लिलाबाई काळुराम शेडगे (वय 52) रा. लोणी काळभोर, पाषाणकर बाग असे गतप्राण झालेल्या महिलेचे नाव आहे, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 रोजी रात्री 8:45 च्या सुमारास लिलाबाई शेडगे यांना हृदयविकाराचा झटका आला खाजगी वाहनाने त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना वाहन वाहतूक कोंडीत अडकले सुमारे एक तास वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने या महिलेवर वेळेवर उपचार झाले नाहीत त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लोणी गाव ते लोणी स्टेशन यादरम्यान वाहतूक कोंडीत एक तास गेल्याने या महिलेला गतप्राण व्हावे लागले त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
एक वर्षापूर्वी या महिलेचा तरुण मुलगा आजाराने मृत्युमुखी पडला होता, त्यानंतर या कुटुंबातील या महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली.
सुमारे एक तास वाहतूककोंडीत रुग्ण महिलेचे वाहन अडकल्याने हॉस्पिटलला पोहोचायला उशीर झाला व यादरम्यान या महिलेचा करूण अंत झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलीस स्टेशन समोरील रस्ता बनले अवैध वाहनतळ…
लोणी काळभोर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर जप्त केलेली वाहने व अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावरच लावलेली असतात, आधीच रस्ता अरुंद त्यातून रस्त्यावर वाहने लावल्याने वाहतूक कोंडीत भर पडते पर्यायाने अशा दुर्दैवी घटना घडतात ज्या पोलिसांकडे न्याय मागायचा असतो त्याच पोलिसांच्या वाहनांचा त्रास नागरिकांना होत असल्याने दाद कोणाकडे मागायची हा सवाल निर्माण झाला आहे.
महामार्गावरील मंगल कार्यालये बनली मृत्यूचा सापळा…
पुणे सोलापूर महामार्गावर गुलमोहर लॉन्स, काळभोर लॉन्स अशी अनेक मंगल कार्यालय आहेत, मोठ्या घरची लग्न असल्याने या मंगल कार्यालयाच्या पार्किंगला मर्यादा येतात त्यामुळे लग्नाला आलेले पाहुणे रस्त्यावरच वाहने लावतात पर्यायाने महामार्गावर वाहतूक कोंडी होते दोन- दोन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने चांगलीच दमछाक होते, मंगल कार्यालय व्यवस्थापनाने वाहनतळाची व्यवस्था कार्यालय परिसरात करावी महामार्गावर वाहने लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक पोलीस कारवाईत दंग वाहतूक कोंडी जैसे थे…
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर पासून थेऊर पर्यंत वाहतूक पोलीस वाहन कारवाई मध्ये दंग असतात वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात होत असताना कारवाईपेक्षा वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांचा पुढाकार असणे आवश्यक आहे मात्र दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात नाहक कोणाचा बळी वाहतूक कोंडीमुळे जातोय, अनेक रुग्णवाहिका अडकून पडतात याकडे लक्ष कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
लिलाबाई काळूराम शेडगे या संत निरंकारी मंडळाच्या सक्रिय सेवादार सदस्य होत्या, रविवारी लोणी काळभोर गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराच्या पूर्वनियोजनसाठी त्या सेवेत दिवसभर कार्यरत होत्या, त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे