पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चीनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपोली असल्याचे चित्र होते. परंतू कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. तरी देखील भारतात साॅफ्टवेअर प्रमाणे हार्डवेअर क्षेत्रातही क्रांती आवश्यक आहे, असे मत ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मृत्यूंजय सिंग यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी, ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृष्ट प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात एआयसीटीईचे चेअरमन टी.जी. सितारामन यांनी देखील मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना मृत्यूंजय सिंग म्हणाले की, सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे म्हणत त्यांनी कौतुकही केले. यावेळी संजीव कुमार यांनी देखील विद्यापीठाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद
स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विकसीत भारत@२०४७ या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या कल्पना ऐकवताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते.