पुणे ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारमध्ये खोतीदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य तोगडा काढला जाईल. खोतीदार शेतकऱ्यांना अचानक का बंदी घातली याविषयी बाजार समितीबरोबर चर्चा करून न्याय दिला जाईल. पुण्यात आल्यावर संचालक मंडळाबरोबर बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांचा दिल्ली येथे अभ्यासदौरा आयोजित केला होता. सहा जनपद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी खोतीदार शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना बाळासाहेब भिसे यांच्या वतीने रोखठोक महाराष्ट्रचे संपादक अनिल मोरे यांनी दिले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, संदीप घुले, तुषार पायगुडे, रागिनी सोनवणे, रामचंद्र कुंभार, आदी उपस्थित होते.
भिसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागिल ३५ वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून माल आणून विक्री करीत आहे. हडपसरमध्ये बाजार सुरू आहे, तेव्हापासून ही परंपरा आहे. आम्ही बाजार समितीची निवडणूक लढविली म्हणून आकसापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. बाजारात बंदी घातल्यामुळे खोतीदार शेतकरी रस्त्यावर शेतमाल विक्री करू लागले आहेत. मात्र, त्याचा वाहतुकीला अडथळा होत असून, शेतकऱ्याची मोठी गैरसोय झाली आहे. आतापर्यंत प्रशासन होते आणि निवडणुका झाल्यानंतर बाजार समिती कारभार पाहू लागले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने खोतीदारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न दिल्ली दरबारी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर मांडल्याने बाळासाहेब भिसे यांनी हडपसर विभागातील पत्रकारांचे आभार मानले आहेत.