पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा जिल्हास्तरीय क्रीडामहोत्सव शुक्रवारपासून (12 जानेवारी) सुरू होत आहे. सासवड (ता.पुरंदर) येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील 3650 विद्यार्थी विविध क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहे. गेली नऊ वर्षापासून सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवाच्या माध्यमातून 972 विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी संस्थेतील विविध विद्यालयांचे वाघोली,खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सूपे, नसरापूर, न्हावरे असे नऊ गट तयार करण्यात आले. नऊ गटांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, या सांघिक तर कुस्ती, बुद्धिबळ,कराटे,तायक्वांदो योगासने, अॅथलेटिक्स या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 15000 खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हापातळीसाठी खेळणार आहेत. त्यातील बुद्धिबळ, कुस्ती, कराटे, तायक्वांदो,कराटे, योगासने या जिल्हापातळीवरील स्पर्धा 8 जानेवारीला पार पडल्या. तर उर्वरीत स्पर्धा 12 आणि 13 जानेवारीला होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सुनेत्राबाई पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा क्रिडाधिकारी महादेव कसगावडे, सावित्रीताई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र.कुलगुरू पराग काळकर,ठाणे जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक, सासवड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय धुमाळ, के.जे.इन्स्टिट्युटचे के.जे.जाधव, त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धांमुळे आजअखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर 62, राष्ट्रीय पातळीवर 328, राज्य पातळीवर 582, अशा एकूण 972 खेळाडूंची निवड झाली. त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर 47, राष्ट्रीय पातळीवर 198, राज्य पातळीवर 398 अशी एकूण 643 पदके विविध खेळाडूंना प्राप्त झाली आहेत. श्रीलंका, मास्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, बॅंकॉक, थायलंड, भूतान या देशात झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव, पाचार्य डॉ.मनोहर चासकर, डॉ.पंडीत शेळके आदि उपस्थित होते.