पुणेमहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षांवर अज्ञातांचा हल्ला बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ः हल्लेखोर दुचाकीवरून पुणे स्टेशनकडे पळून गेले

अशोक बालगुडे
पुणे, दि. १६ ः ससून रुग्णालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर दोन अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सोमवारी (दि. १५ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. हल्लेखोरांनी दुचाकीवरून पुणे स्टेशनच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, प्रफुल्ल गुजर ससून रूग्णालयात वास्तवास असून, मागिल अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करीत आहेत. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मित्रांसह ससून रूग्णालयाच्या गेटसमोर चहा घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मात्र, गुजर यांनी सावध पवित्रा घेतल्याने ते थोडक्यात बचावले. हल्ला करून हल्लेखोर पुणे स्टेशनच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर पुढे पुणे स्टेशनच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून पळून गेले. या हल्ल्यात गुजर यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

दरम्यान, गुजर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा सखोल तपास करून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गुजर कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक धनवडे करीत आहेत.