पुणे- जुन्नर तालुक्यातील पूर येथील कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचे काम करण्याच्या दिशेने पाहिले पाऊल पडले असून कळस बसवण्यापूर्वी मंदिराच्या मजबुतीकरण्यासह अन्य कामांसाठी सुमारे २ कोटी ६ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
पूर येथील पुरातन कुकडेश्वर मंदिरावर कळस नसल्याने स्थानिक आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षापासून कळस बांधण्याची मागणी करीत होते. परंतु मंदिराचे स्ट्रक्चर वजन पेलण्यास सक्षम नसल्याने कळस बांधता येणार नाही अशी भूमिका राज्य पुरातत्व विभागाने घेतली होती. परंतु हिंदू मंदिरामध्ये कळसाचे महत्त्व आहे, त्यामुळे हा कळस उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याच्या पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी चर्चा करून कुकडेश्वर मंदिरावर कळस उभारण्याची मागणी केली होती. डॉ. गर्गे यांनी मंदिराच्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करून तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून प्रस्तावित कळसाच्या बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक करण्याचे निर्देश सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांना दिले होते. त्यानुसार कळस उभारण्यासाठी नासाडिया वास्तुविशारद या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने केलेल्या पाहणीअंती कळसाचे वजन पेलण्याची क्षमता सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये नसल्याचे निष्कर्ष नोंदवला होता. परंतु खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा सहायक संचालक डॉ. विलास वहाणे व सल्लागार संस्थेचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती. त्यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑर्डर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आग्रह आणि आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पुरातत्व विभाग, पुणे यांनी मंदिराचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेतले. त्यानुसार प्रथम मंदिराचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. वाहणे यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून पाठपुरावा केला. अखेरीस कुकडेश्वर मंदिराच्या छताचे मजबुतीकरण, संरक्षण भिंत, मंदिराच्या आतील व बाहेरील दगडी फरशी, मूर्तींचे दुरुस्ती व संवर्धन तसेच माहितीचे फलक आदी कामांचे सुमारे रु. २,०६,३४,५७० इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर काल (दि 18 रोजी) या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात मजबुतीकरणासह विविध कामे करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून त्यानुसार कळसाचे वजन पेलण्याची क्षमता पाहून कळस बसविण्यात येणार आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यामुळे कुकडेश्वर मंदिरावर कळस बसविण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे, असे म्हणता येईल.