पुणेमहाराष्ट्र

सेल्फी काढणे बेतले जीवावर; वाहून जाणाऱ्या 2 बहिणींना वाचवण्याच्या नादात भावाचा गेला जीव…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावल्याची उदाहरणे आहेत. मागील महिन्यात घाटात सेल्फी घेण्याच्या नादात एक नवविवाहिता दरीत पडल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. अशीच एक घटना काल पुण्यातील पानशेत धरण परिसरात घडली आहे. धरणाच्या सांडव्यात उतरून सेल्फी घेत असताना पाण्यात पडून बुडणाऱ्या बहिणांना वाचवताना भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक युवकांनी जीवाची बाजी लावून दोघींचे प्राण वाचवले. परंतु बुडणाऱ्या बहिणांना वाचवायला गेलेल्या भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अनुसया बालाजी मनाळे व मयुरी बालाजी मनाळे अशी त्याच्या बहिणींची नावे आहेत. मात्र यात ज्ञानेश्वर बालाजी मनाळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मनाळे हा आपल्या बहिणी व मित्र-मैत्रिणींसह रविवार सुट्टी असल्याने पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण आपापल्या दुचाकींवरुन पानशेतहून माघारी घरी निघाले असता पानशेत धरणाच्या वीज निर्मिती सांडव्यावरील पुलावरून जाताना पुलाजवळील धो-धो वाहत असलेल्या सांडव्यावर सर्वजण गेले. पाण्याच्या कडेला उभे राहून ते सेल्फी काढत होते. त्यावेळी अनुसया पाय घसरून पाण्यात पडली. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण मयुरी ही पाण्यात उतरली मात्र वेगाने वाहणाऱ्या पाण्यात दोघीही बुडू लागल्या.

त्यांना वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने याने पाण्यात उडी मारली. व ते तिघेही वाहून जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. सांडव्या जवळ जोरजोरात आवाज आल्याने स्थानिक युवक साईराज संतोष रायरीकर व करण बाबुराव चव्हाण सांडव्यात उड्या मारत बुडणाऱ्या अनुसया व मयुरी यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. परंतु या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर मिळून न आल्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पकंज मोघे, अंमलदार कांतीलाल कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर सह्याद्री आपत्ती व्यवस्थापनचे पथक तसेच पुणे महानगर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, चोंडे, संदीप सोलसकर व आबाजी जाधव तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाच वेळी सांडव्यात उतरून दोन्ही बाजूला ज्ञानेश्वर याचा शोध सुरू केला. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते संदीप सोलकर यांना सांडव्याच्या एका बाजूला खोल पाण्यात ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरील घटनेचा पुढील तपास वेल्हा पोलीस करत आहेत.