पुणे, दि. २२: राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उदघाटन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर व निमंत्रक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
संमेलनाध्यक्ष गोरे यांच्या फेसाटी कादंबरी चा मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास क्रमात समावेश करण्यात आला आहे, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. वारुळ, मुराळी, सत्यघटना, रौंदाळ आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे, फेसाटी कादंबरी ला केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
दि. 28 जानेवारी रोजी पुणे येथील आंबेगाव पठारावर पुणे केंब्रिज शिक्षण समुहाच्या प्रांगणात साहित्य संमेलन होत आहे, सकाळी दहा वाजता ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे, दुपारी १२ वाजता उद्घाटन समारंभाला प्रारंभ होईल.
प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले, ज्येष्ठ नाट्यकलावंत वसंत अवसरीकर, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडी, आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन करण्यात येईल.
दुपारी अडीच वाजता आजची युवा पिढी आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, अध्यक्ष डॉ संदीप सांगळे असून, प्रा योगेश्री कोकरे, रविकांत वरपे, प्रकाश धिंडले सोनल पवार सहभागी होणार आहेत.
साडेतीन वाजता मी सावित्री बोलतेय हा नाट्य प्रयोग अश्विनी दिक्षित सादर करतील. संमेलनाला कविंचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, कविसंमेलनाची तीन सत्रे होणार आहेत, संमेलनाच्या संयोजन बैठकीला संमेलन स्वागत समितीचे सदस्य मयुर कुंजीर, स्मिता कुलकर्णी, स्वीटी सकपाळ, सुजाता निंबाळकर, जगदीप विश्व आदी उपस्थित होते.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, नवीन युवक व विद्यार्थी यांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वैभवशाली वारसा लाभलेला हा परिसर आहे. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.