पुणेमहाराष्ट्र

माणुसकी जिवंत राहण्यासाठी एकोप्याची गरज : नवनाथ लोंढे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक व्याख्यानमालेचा समारोप

आपण शालेय जीवनापासून “भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत” अशी प्रार्थना म्हणत आलो आहोत पण प्रत्यक्षात मात्र तसे वागतो का? समाजात आज विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. जातीजातीत, धर्माधर्मात भेद निर्माण झाले आहेत. माणसामाणसातील माणुसकी मरत आहे. ही माणुसकी जिवंत राहण्यासाठी समाजात एकोप्याची गरज आहे. ” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लोंढे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप साहेब व मामासाहेब मोहोळ स्मृतीसप्ताहानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापण परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प सामजिक कार्यकर्ते नवनाथ लोंढे यांनी ‘ सावधान, माणुसकी मरत आहे !’ या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेवाळवाडी येथील शिवशंभो जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयप्रकाश शहा उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा. नाना झगडे यांनी केले.

मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे यांनी माणूस सेवेतून निवृत्त झाला तरी त्याच्या सामाज सेवेच्या व्रतापासून ध्येयापासून निवृत्त होत नाही. समाजाचं ऋण फेडण्यासाठी जेष्ठांची सेवा करावी असे मत व्यक्त केले.

” समाजातील वातावरण बिघडत असताना आपण सकारात्मकता व अनुशासन अंगीकारले पाहिजे ” असे मत शेवाळवाडी येथील शिवशंभो जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयप्रकाश शहा यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. नीता कांबळे, डॉ. अशोक ससाणे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अनिता गाडेकर, प्रा. नेहा साळुंखे, प्रा. ऋषिकेश मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार डॉ. अशोक ससाणे यांनी मानले.