पुणे, दि. ९ : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडिल बाजीराव, आई, मेहुणे मल्हार कुंजीर, मित्र समीर चौधरी, डॉ. डी. वाय. मोटे, डॉ. राजश्री मोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी पुण्यात शिक्षणानिमित्त स्थायिक झाली. समाजमाध्यमात तिची आरोपी निरंजन घुले याच्याशी ओळख झाली. निरंजनने तिला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणी गर्भवती झाल्याची माहिती निरंजनच्या आई-वडिलांना मिळाली. त्यांनी तरुणीला गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात न केल्यास जीवे मारु, उजनी धरणात फेकून देऊ, अशी धमकी दिली. तरुणीला धमकावून ऊरळी कांचन येथील डॉ. मोटे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे तिचा बेकायदा गर्भपात करण्यात आल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.