माजी प्राचार्या गिरे ः चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा
पुणे, दि. १३ ः माजी विद्यार्थिनींचे शिक्षकांवरील प्रेम आणि त्यांच्या उत्साह वाखाणण्यासारखा आहे. तुमच्याकडे पाहून शिक्षकांचे कार्य फलदायी ठरले आहेत, याचा सार्थ अभिमान वाटत आहे. आयुष्यामध्ये तुम्ही अशाच यशस्वी होत राहा, समाजासाठी खूप चांगले कार्य करा, असा स्पष्ट विचार माजी प्राचार्या इंदिरा गिरे यांनी दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये दहावीतील २०००-०१ मधील विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. याप्रसंगी प्राचार्या सुजाता कालेकर, उपप्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, पर्यवेक्षिका छाया पवार, २० माजी शिक्षक आणि २२० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी माजी विद्यार्थिनी व सध्या विद्यालयातील शिक्षिका कविता टिळेकर आणि ममता कुमठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरम्यान, स्वाती ताम्हाणे, हेमलता हिंगणे, अर्चना काकडे व प्रियांका माळवदे माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्या सुजाता कालेकर म्हणाल्या की, रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींची यशोगाथा मोठी आहे. शाळा तुमचीच आहे, तुम्ही शाळेला भेट द्या आणि नवनवीन संकल्पना सूचवा, शाळा तुमचीच आहे आणि कायम तुमचीच राहील. शाळेची विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व मिळालेले उत्तुंग यश प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले.
कविता टिळेकर यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी कुंभार व मीनाक्षी फुलारे यांनी सूत्रसंचालन केले. ममता कुमठे यांनी आभार मानले.