पुणेमहाराष्ट्र

किर्लोस्कर वसुंधराने तीस विद्यार्थांना दिले ‘मिलेट्स‘ चे धडे!

 पुणेः- ‘नको आम्हाला फास्टफूड .. मिलेट्स आमचे फर्स्टफूड‘ या घोषवाक्याचा गजर करत हडपसर भागातील साधना विद्यालयातील सुमारे तीस हजार विद्यार्थांनी रोजच्या खाण्यात मिलेट्सच्या वापराचा निर्धार व्यक्त केला. किर्लोस्कर न्युमॅटिक्स् कंपनी लिमिटेडच्या वतीने आयोजित ‘मिलेट्स (भरडधान्य) पंधरवड्या ‘दरम्यान,साधना प्राथमिक विद्यामंदीर, साधना मुलांचे विद्यालय, साधना इंग्लिश स्कूल, साधना मुलींचे इंग्लिश विद्यालय, चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालय येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

सर्व शाळांमधील विद्यार्थांना भरडधान्यांचे महत्व कळावे या साठी दृक्-श्राव्य व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. धान्याचे प्रकार, इतिहास, त्यांच्या जाती, त्यातील पोषक घटक, आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, जीवघेण्या रोगांपासून होणारे संरक्षण अशी महत्वाची माहिती रंजक पध्दतीने संतोष बोबडे यांनी सांगितली. यावर मुलांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक शाळेतील, दर्शनी भागातील मोठी भींत दिपक शिंदे आणि बंडू गोपीरेड्डी यांनी रंगविली. मिलेट्स मुळे पेशींची आणि लोहाची वाढ कशी होते, मधुमेह कसा नियंत्रित रहातो, शरीराला कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर कसे मिळते, स्नायू बळकट होऊन वजन कसे नियंत्रित रहाते आणि या सर्वांमूळे मानसिक आरोग्य कसे सुधारते याची माहिती भित्तीचित्रांव्दारे देण्यात आली.

 

मिलेट्सची ‘पाककला स्पर्धा’ हे या पंधरवड्याचे विशेष आकर्षण होते. मिलेट्सचे अनेक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ करता येतात, याचे उत्तम उदाहरण विद्यार्थी व पालकांनी या स्पर्धेतून दिले. बाजरीचे नूडल्स, नाचणी-राळ्याचे लाडू, बाजरीची सांजोरी, वरईचे वडे, ज्वारीचा पिझ्झा, भरडधान्याचे बिस्क़िट्स, इत्यादी २०० पेक्षा जास्त पदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले होते.यावेळी मिलेट्स पंधरवडा या संकल्पने बद्दल बोलताना किर्लोस्कर न्युमॅटिक्सच्या बीएसएसहेल्थ आणि सी.एस. आर. ओ.एच.सी. चे व्यवस्थापकीय संचालक  डॉ. सुरेश मिजार म्हणाले की,  हा निव्वळ महोत्सव नसून त्यामध्ये सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम आम्ही राबविणार आहोत. या वैविध्यपूर्ण पाककृतींचा प्रसार व्हावा यासाठी एक आकर्षक पुस्तिका प्रत्येक विद्यार्थाला देण्यात येणार आहे. विद्यार्थांच्या डब्यात बदल घडावा आणि त्यात मिलेट्स पदार्थांचा अंतर्भाव व्हावा, हा आमचा उद्देश्य आहे.यावेळी बोलताना किर्लोस्कर वसुंधरा चे संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले की, २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य म्हणून युनोनी घोषित केले होते. ज्यामुळे भरडधान्याची ओळख़ जगभर झाली, शेतकऱ्यांच्या धान्याला भाव आला अनेक स्टार्टअप्स् उभे राहिले. २०२४ या वर्षात मिलेट्सची ओळख व महत्व विद्यार्थांना पटावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 

या महोत्सवाचे संयोजन सुवर्णा भांबूरकर आणि राम पाटील यांनी केले. तसेच मुख्याध्यापिका सुजाता कालेकर, जिन्नत सय्यद, डी. जी. जाधव, लक्ष्मी आहेर, रोहिणी सुशिर आणि  महेंद्र रणावरे या शिक्षकांनी सहकार्य केले. तुषार सरोदे आणि अर्जुन नाटेकर यांनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.