पुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा विजयाचा निर्धार “शरद पवार हेच चिन्ह व शरद पवार हेच नाव”- प्रशांत जगताप

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या तमाम नेत्यांची आज पुण्यात गर्दी बघायला मिळाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरदचंद्र पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात पक्षाचे सर्व माजी मंत्री, आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षाचे चिन्ह व पक्षाचे नाव अजित पवार गटाला देऊ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ही पहिलीच मोठी बैठक होती. पक्षाचे नाव व चिन्ह यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू असला तरी प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेची शक्यता लक्षात घेता नवीन नाव व नवीन चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याच्या सूचना शरदचंद्र पवार यांनी सर्वांना केल्या.

 

केंद्रात व राज्यात सुरू असलेली दडपशाही जनता बघत आहे, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचून त्यांना धीर द्यायचा आहे, जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.
खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉक्टर अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आ. रोहित पवार, आ. संदीप क्षीरसागर हे या बैठकीस उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आगामी निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

* “आमचा लढा हा सत्तेसाठी नसून अस्तित्वासाठी आहे. म्हणून कुठेही विलीन होण्याचा प्रश्नच नाही, आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात लढू आणि ऐतिहासिक विजय मिळवू.” – प्रशांत जगताप*