पुणे

“मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत महिलेशी गैरवर्तन भोवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अन दामिनी पथकातील दोन महिला कर्मचारी निलंबित… वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी”

पुणे (अनिल मोरे )
मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दामिनी पथकातील दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी ही माहिती दिली. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकाची अल्पावधीत बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हडपसर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) त्या महिलेला मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीसाठी बोलावले होते.
महिला पोलिसांसमक्ष तिची चौकशी करण्यात आली. महिलेला पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ती महिला नातेवाइकांसह मगरपट्टा पोलिस चौकी आली. त्यावेळी या महिलेने तिला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली.
‘या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दोरकर, पोलिस कर्मचारी सोनकांबळे आणि उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.

 

“पोलीस आयुक्तांचा बडगा …दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी…
हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. त्याप्रकरणी हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीसमोरच एका तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची देखील उचलबांगडी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उचलबांगडीबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.