पुणेमहाराष्ट्र

तिसऱ्यांदा मिळालेला संसदरत्न पुरस्कार मायबाप जनतेला समर्पित – खासदार डॉ. अमोल कोल्हे

 

पुणे – कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला समर्पित करतो अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज नवी दिल्ली येथे संसदरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला, त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्याच टर्ममध्ये तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगत शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला सेवेची संधी दिली. जनतेचा आशीर्वाद स्वीकारून त्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सभागृहात संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताच निलंबन झाले, मात्र स्वस्थ न बसता थेट रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढून लढा दिला. त्याचबरोबर शिरुरच्या जनतेला दिलेले विकासाबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करता आली याचे मला विशेष समाधान आहे. शिवशंभू विचारांचा आदर्श ठेवत सत्ता नाकारून मतदारांनी दिलेला आशीर्वाद व नेतृत्वावरील निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत मायबाप मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. या पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करीत राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

संसदेत बजावलेल्या कामगिरीमुळे संसदरत्न पुरस्कार मिळाला असला तरी मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांचा प्रश्न मार्गी लावला असून नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या तीनही रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. बायपास रस्त्यांची कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात दिलेल्या शब्दांचीही पूर्तता केली आहे, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. त्याचबरोबर ३०० एकरावरील इंद्रायणी मेडिसिटीला मंजुरी मिळाली आहे. चाकणला कामगार विमा योजनेचे रुग्णालय मंजूर झाले आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. शिवनेरीच्या रोपवेसाठी राज्य सरकार आणि नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लि. यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. वढु तुळापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे, असे सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसंस्कार सृष्टी व इतर अनेक प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी पुढील काळात काम करणार असल्याचे सांगितले.