छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी भक्कम गडकिल्ले उभारली. त्यासाठी आवश्यक असणारे नवीन तंत्रज्ञान स्वीकारले. गडकिल्ल्यांमधून आपल्याला ऊर्जा, उर्मी, प्रेरणा मिळते. गडकिल्ल्यांची, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. जशी गडकिल्ल्यांची पडझड होऊन डागडुजीचे करण्याची गरज आहे तशीच आज विचारांची डागडुजी करण्याचीसुद्धा गरज आहे. गडकिल्ल्यांप्रमाणेच विचारांचा पाया भक्कम करा. असे आवाहन पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आयोजित एक दिवसीय ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन कार्यशाळेचे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मल्हारगडावर आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. या प्रसंगी दिवे गावचे माजी सरपंच अमित झेंडे, छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानचे कुंडलिक जाधव, गणेश बरकडे उपस्थित होते.
ऐतिहासिक वारसा स्थळातून इतिहास, संस्कृती, स्थापत्य कला याची उत्कृष्ट वैशिष्ट्ये बघायला मिळतात. अशी वारसा स्थळे व महापुरुषांच्या पराक्रमातून आपल्याला प्रेरणा मिळत असते म्हणून ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन केले पाहिजे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील २० महाविद्यालयातील १०५ विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या साहाय्याने मल्हारगडावर ढासळलेल्या बुरुजाच्या भिंतीच्या डागडुजीचे काम केले.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन लगड, प्रा. गौरव शेलार, डॉ. अंजू मुंढे कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. नाना झगडे, प्रा. प्रतीक कामठे, प्रा. सविता भुजबळ, प्रा. स्नेहल मोडक, प्रा.अविनाश राठोड प्रा. गणपत आवटे, नाना शिंदे, चंदू साठे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. नितीन लगड यांनी मानले.