पुणेमहाराष्ट्र

“मिसिंग लिंकचे काम करण्यापूर्वी संरक्षक भिंत बांधा अन्यथा आंदोलन – रविपार्क सोसायटीच्या रहिवाशांचा महापालिकेस इशारा…

हडपसर : ससाणेनगरच्या डाव्या बाजूला असलेल्या रेल्वे अंडरपास पलिकडील रविपार्क सोसायटीशेजारून महानगरपालिकेने मिसिंग लिंक मोहिमेअंतर्गत रस्ता बांधनी सुरू केली आहे. मात्र, आगोदरच चार-पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी रस्त्यासाठी खोदकाम करताना सोसायटीच्या भिंतीचा पाया उघडा पडून कलला होता. दोन वर्षांपूर्वी तीचा ३०-४० फूटाचा भाग कोसळलाही आहे. त्यामुळे आता महापालिकेने प्रथम संरक्षक भिंत बांधून द्यावी व त्यानंतरच रस्त्याचे काम करावे, अशी मागणी करीत सोसायटीधारकांनी आंदोलन सुरू केले आहे.

महानगरपालिका मिसिंग लिंक मोहिमेअंतर्गत येथील रविपार्क सोसायटी शेजारील रस्त्याचे काम करीत आहे. रेल्वे अंडरपासजवळ ही सुमारे ३३४ सदनिका असलेली सतरा वर्षांपूर्वीची मोठी सोसायटी आहे. या सोसायटीच्या तीनही बाजूने सध्या रस्ता वाहतूक सुरू आहे. अंडरपासच्या बाजूने झालेल्या खोदाईमुळे आगोदरच संरक्षक भिंत बाहेरील बाजूला कलली आहे. सोसायटीच्या दक्षिणेकडील बाजूनेही चारपाच वर्षांपूर्वी १८ मीटरच्या डी.पी. रस्त्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी सोसायटीच्या भिंतीला धोका झाला होता. त्यामुळे सोसायटीने या रस्त्याचे काम बंद पाडले होते. पुढे दोन वर्षांनी या भिंतीचा काही भाग कोसळला होता. पालिकेने पुन्हा या रस्त्याचे काम सुरू केल्याने सोसायटीतील नागरिकांनी आंदोलन करून हे काम बंद पाडले आहे.

“पालिकेने मंजूरी नसताना चारपाच वर्षांपूर्वी बेकायदेशीर रस्त्याचे काम सुरू केले होते. त्यामध्ये काही दिवसांनी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. आता पुन्हा मिसिंग लिंकच्या नावाखाली काम सुरू केले आहे. आमचा रस्त्याच्या कामाला कोणताही विरोध नाही. मात्र, हे काम करण्यापूर्वी सोसायटीच्या संरक्षक भिंतीचे काम करून द्यावे. असे न केल्यामुळे सध्या आम्ही रस्त्याचे काम बंद पाडले आहे. यापुढेही आमची हीच भूमिका असून त्यासाठी आंदोलन तीव्र करू.’
वैभव माने
संचालक, रविपार्क सोसायटी

“होत असलेल्या रस्त्याचा आणि सोसायटीच्या भिंतीमध्ये आठ-दहा फूटांचे अंतर आहे. त्यामुळे सोसायटीला काहीही अडचण नाही. सोसायटीधारक व वरिष्ठांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हा रस्ता झाल्यास मोठा वळसा कमी होऊन वाहतुकीचा धोकाही कमी होईल.’
साहेबराव दांडगे
अधिक्षक अभियंता, महापालिका पथविभाग