हडपसर/ शिरुर (अनिल मोरे)
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित ‘शिरूर’ लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फायनल झाल्यात जमा आहे, शिवसेनेचा पठ्ठ्या आता अजितदादांच्या तालमीत प्रवेश करणार असल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातच सामना रंगणार आहे. अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने डॉ.कोल्हे यांनी पाटलांना मागील निवडणुकीत धोबीपछाड केले होते, आता राजकीय समीकरणे बदलल्याने या मतदारसंघात काटे की टक्कर अनुभवायला मिळणार आहे.
खेड व शिरूर लोकसभा मतदारसंघात तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे, त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यातच राष्ट्रवादीत दोन गट झाल्याने शरद पवारांच्या समवेत गेलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा चंग बांधलेल्या अजित पवारांचा झंजावात पवार काका रोखणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
मागील निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे हे नवखे उमेदवार होते परंतु स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेमुळे घराघरात त्यांचा चेहरा पोहोचला होता, त्यातच त्यांनी हडपसर मध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे तीन दिवस प्रयोग करून पुन्हा आव्हान निर्माण केले आहे, विधानसभेच्या सहा मतदार संघात चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार शरद पवार गटाचा तर एक आमदार भाजपचा आहे, मागच्या निवडणुकीत आढळराव पाटील यांना भोसरी व हडपसर मधून लीड मिळाले होते, परंतु आंबेगाव जुन्नर या भागातून पिछाडीवर रहावं लागल्याने पराभूत व्हावे लागले, पराभूत झाल्यानंतरही त्यांनी गेली पाच वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क कायम ठेवला, प्रत्येक गावात त्यांचा संपर्क आहे, डॉ.अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी पडत असला तरी शरद पवार यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाट, भाजप विरोधी वातावरण, व महायुतीतील बेबनाव हा त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर हे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असून भोसरी व हडपसर हे दोन शहरी मतदारसंघ आहेत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची चांगली ताकद आहे मात्र भाजप बरोबर त्यांचा जाण्याचा निर्णय मतदारांना कितपत रुचेल हा एक प्रश्न आहे, विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची लोकप्रियता व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क यामध्ये कोण बाजी मारणार? हे येणारा काळ ठरवेल मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर विधानसभेचे राजकारण अवलंबून असल्यामुळे विद्यमान आमदार इमानदारीने काम करतात की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही कॉम्प्रमाईज करतात हे निवडणूक निकालानंतर कळेल. सध्या तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.कोल्हे व आढळराव पाटील हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार असून ‘काटे की टक्कर’ अशी लढत होईल आणि शिरूर च्या मातीत कोणता पैलवान धोबीपछाड देणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.