पुणे ः ओळखीचा गैरफायदा घेऊन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार कैलास काकडे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुधवारी (दि. २० मार्च) हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे घडला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, तो सध्या अमरावती जेलमध्ये आहे.
पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तुषार काकडे हा दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, चाकु या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी तुषार काकडे याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.