पुणे

“भाजपचे माजी नगरसेवक व दोन मुलांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, शेतकऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार”

लोणी काळभोर, (पुणे) : होळकरवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्याच्या शेतात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी कौसरबाग – महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 चे माजी नगरसेवक व त्याच्या दोन मुलांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक संजय गुलाब घुले, सचिन संजय घुले, अनिकेत संजय घुले (रा. तिघेही, महंमदवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी शेतकरी बाबासाहेब भगवान आतकीरे (वय-५५, रा. शिवाजी चौकाजवळ, कोंढवा (बु), गावठाण, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतकरी आतकीरे यांची होळकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत शेती आहे. या ठिकाणी असलेल्या शेतीला तारेचे कुंपण करण्यात आले होते. बुधवारी संजय घुले, सचिन घुले, अनिकेत घुले हे तिघेजण आले व त्यांनी तारेचे कुंपण तोडून शेतीच्या बाजूला असलेले ५ लाख रुपयांचे कुंपण तोडून आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान, फिर्यादी आतकिरे यांचे बंधू विश्वास आतकीरे याना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बाबासाहेब भगवान आतकीरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरसेवक संजय घुले यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पुणे महापालिकेच्या नाव समितीचे घुले हे उपाध्यक्ष..
संजय घुले हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत ते कौसरबाग महंमदवाडी या प्रभाग क्रमांक 26 मधून निवडून आले होते. पुणे महापालिकेच्या नाव समितीचे घुले हे उपाध्यक्षदेखील होते.