Uncategorized

“वंचित कडून मंगलदास बांदल यांना शिरूर मधून उमेदवारी दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढली… “वंचितचा उमेदवार महाविकास की महायुतीच्या उमेदवाराला फटका देणार?

पुणे (प्रतिनिधी )
लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाले असून, रोज नवीन घडामोडी घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडी  आणिप्रकाश  आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. मात्र, असे असतानाही महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका वंचितने घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील  विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचितने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार निवडणुकीसाठी दिलेला नाही. शिरूर मध्ये वंचित चा उमेदवार महाविकास आघाडी की महायुतीच्या उमेदवाराला फटका देणार याची चर्चा रंगली आहे.

बारामतीबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील  लढतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातून खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांनी शिवसेनेतून आयात करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या मतदारसंघातून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढत दुरंगी होणार असल्याचे वाटत असतानाच आता या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार जाहीर केला आहे. 

“कोण आहेत वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल?

राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल  यांना वंचितने शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या मतदारसंघात डॉ. कोल्हे – आढळराव पाटील- बांदल अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधानसभेच्या निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक  देखील लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. 
शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वेळी आणि उमेदवारी जाहीर करताना मंगलदास बांदल तेथे उपस्थित होते. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेटदेखील घेतली होती. मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचीदेखील बांदल यांनी भेट घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कातदेखील ते होते. अखेर बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता शिरूरमध्ये चांगली लढत पाहायला मिळणार आहे.

“वंचित चा फटका महाविकास आघाडी की महायुतीला…
मंगलदास बांदल हे राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी आणल्याने त्यांच्या उमेदवारीचा फटका नेमका महाविकास आघाडीच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना बसणार की महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील यांना बसणार याबाबत राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.