पुणे

करारा जवाब मिलेगा, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यावर पलटवार

निमगावसावा : आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. अमोल कोल्हे यांनी बेनके यांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गावागावात कोल्हेचे जोरदार स्वागत होत आहे.यावेळी निमगावसावा आणि साकोरी येथे ग्रामस्थांनी केलेल्या स्वागत केल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की,घरात चार टर्म आमदारकी नव्हती, तरी शेतकऱ्यांचं पोरगं खासदार झालं, या खासदार शेतकऱ्याच्या पोराचं पंतप्रधान कौतुक करतात म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला का ? असा सवालही त्यांनी केला.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याची माती झाली आणि त्यासाठी संसदेत मी आवाज उठवतो, शेतकऱ्यांनाचे प्रश्न मांडतो म्हणून पश्चाताप झाला?, शेतकऱ्याच्या पोराला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो म्हणून पश्चाताप झाला ? तुमच्या खासदाराचा देशात तिसरा नंबर लागला म्हणून तुम्हाला पश्चताप झाला? ज्यांच्यामुळे तुमची लॉटरी लागली त्यांचा तुम्हाला पश्चताप झाला ? असे अनेक सवाल उपस्थित करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा चांगलाच समाचार घेतला.

 

कोण दबाव टाकत असेल तर मी ठामपणे उभा आहे हे लक्षात ठेवा, दबाव टाकणाऱ्यांना सांगा केंद्रातील मोदी सरकार जाणार आहेच, जुन्नर तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार आहे, तुम्ही पश्चात्ताप झाला अस सांगत असला तरी, उलट जुन्नर तालुक्याला पश्चताप झालाय , शिवाजी महाराजांनी कोणाला दगा फटका दिला नव्हता. तुम्ही शरद पवारांना दगा फटका दिला, म्हणून जुन्नरच्या जनतेला पश्चताप झालाय, पुढे अजून विधानसभेची निवडणूक आहे मी या निवडणुकीतुन मोकळा झालो की करारा जवाब मिलेगा, सत्तेतील लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निधी मिळाला, आता तुम्ही कोणाची पालखी वाहता हे लोकांना कळतंय

यावेळी डॉ. कोल्हे यांच्या सोबत विघ्नहर सहकारी कारखान्याचे सत्यशील शेरकर, शिवसेना नेते माऊली खंडांगळे, भास्कर गाडगे ,माजी आमदार बाळासाहेब दांगट, पांडुरंग साळवे, आनंद चौघुले, जयंवत घोडके, निवृत्ती साळवे, दत्ता गाडगे, शरद चौधरी, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.