पुणे

शिरूर शहरासाठी ७० कोटींची पाणी योजना मंजूर केल्याचे समाधान : शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर : शिरूर शहरासाठी महत्त्वपूर्ण अशी ७० कोटींच्या पाणी योजनेचे काम सुरू झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन शिरूर शहरातील नागरिकांची दररोजच्या पाण्याची महत्त्वाची गरज भागवली जाणार आहे. या व अशा अनेक योजना महायुती शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आल्याचे समाधान वाटते, अशी भावना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर तालुक्यातील दौऱ्यास ठिकठिकाणी ग्रामस्थ, महिला, तरुणाईकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. काची समाजाचे जिल्हाध्यक्ष अविनाश मल्लाव, शहर विकास आघाडीचे प्रमुख ॲड. सुभाष पवार, रांजणगाव गणपती येथे जिल्हा परिषद सदस्य माणिक भिकाजी खेडकर यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. यावेळी तरुणाईने जोरदार स्वागत केले. दरम्यान, या दौऱ्यात शिरूर तालुक्यामध्ये मल्लाव यांच्या निवासस्थानी महिला व चिमुकल्यांनी औक्षण केले. शिरूर येथील हनुमान मंदिर, शहरातील ऐतिहासिक वारसा असलेले रामलिंग देवस्थान व रांजणगाव गणपती येथे जाऊन आढळराव दादांनी दर्शन घेतले.
दरम्यान, जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे ११ वे प्रमुख आचार्य परमपूज्य श्री महाश्रमणजी आणि राष्ट्रसंत कमल मुनीजी यांच्या मंगलमय उपस्थितीने शिरूरकर भारावून गेले. आशीर्वाद घेण्यासाठी आणि या दोन्ही पूज्य आध्यात्मिक महापुरूषांचे ज्ञानवर्धक प्रवचन ऐकण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, आचार्य श्री महाश्रमणजी आणि राष्ट्रसंत कमल मुनीजी यांच्या प्रवचनानिमित्त उपस्थितीत राहणे हा एक अतिशय प्रेरक व भाग्याचा अनुभव होता. त्यांच्या आशीर्वादरूपी शब्दांनी माझे अंत:करण शांततेने भरले आहे. जैन धर्म हा अधिक उद्देशाने आणि दयाळूपणे जगण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे या धर्माविषयी सर्वांनाच आदर वाटतो. उपस्थित नागरिकांना आढळराव पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रवी बापू काळे, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, भाजपा उपाध्यक्ष मितेश गादीया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेना शिरूर शहर प्रमुख मयूर थोरात, भाजप शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, नगरसेवक विनोद भालेराव, नगरसेविका अंजली मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, युवक अध्यक्ष अमोल वरपे, भरत जोशी, संतोष वरपे, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहरसंघटक सुदाम चव्हाण, विजय नरके, निलेश नवले, शरद नवले, प्रिया बिराजदार, अनघा पाठक, रेश्मा शेख, अर्चना सोनवणे, जयवंत साळुंखे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.