पुणे :- भारतीय संस्कृतीमध्ये पिढ्यान पिढ्या संस्कारांचे हस्तांतरण होत असल्याने भारतीय संस्कृतीत, समाजात आणि कुटुंबात ज्येष्ठांना आदराचे स्थान आहे, असे मत माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
जनसेवा फाऊंडेशन आणि पुणे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक संघाच्या विभागीय आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून देवधर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर होते. यावेळी व्यासपीठावर जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना शहा, विश्वस्त प्रा. जे.पी .देसाई, नवचैतन्य हास्य योग संस्थेचे विठ्ठल काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील देवधर म्हणाले की, भाषेतून संस्कारांची शिंपण होत असल्याने मातृभाषेतून शिक्षणाबाबत पालकांनी निग्रही राहणे आवश्यक आहे. आपल्या मराठी भाषेला समृद्ध इतिहास आणि दीर्घ परंपरा लाभली आहे. मातृभाषेद्वारे विचारांचे आणि भाव भावनांचे योग्य आदान-प्रदान होते.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, ज्येष्ठांनी आरोग्याची काळजी घेत सुखी समाधानी आयुष्य जगावे. तसेच समाजात सर्वार्थाने समतोल आणि सुसंवाद प्रस्थापित होईल आणि तो टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल रहावे.
यावेळी जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार चेतन तुपे यांनी आचारसंहितेमुळे उपक्रमास केवळ सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा फाऊंडेशनचे विश्वस्त प्रा.जे.पी .देसाई यांनी केले, तर
मोहोन खटावकर आणि सुजाता टोके यांनी सुत्रसंचलन केले .शिवाजी पवार यांनी आभार मानले .