पुणे

खेड तालुक्यातील ‘त्या’ वादग्रस्त बॅनरनंतर आता ‘गावासाठी काय केले,’ शिरूरमधील करंदी गावातील ग्रामस्थांची कोल्हेंना विचारणा

पुणे (प्रतिनिधी )
‘अमोलदादा, तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात स्वागत!’ असे उपरोधिक बॅनर शिरूर लोकसभेतील आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात रासे (ता. खेड) या गावात लागल्याचे सोमवारी (15 एप्रिल) समोर आलं होतं. त्यानंतर आता ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले,’ असा सवाल शिरूर तालुक्यातील करंदी ग्रामस्थांनी मंगळवारी (16 एप्रिल) कोल्हेंना भर प्रचार सभेत केला.

2019 ला खासदार झाल्यावर कोल्हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याचा मुद्दा घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) शिवाजीराव आढळराव-पाटील आपल्या प्रचारात त्यावरच अधिक भर देत आहेत. तोच मुद्दा कोल्हेंना अडचणीचा ठरतो आहे.

मतदारसंघातील कधीच न फिरकलेल्या गावात कोल्हेंना त्याबाबत विचारणा होत आहे. त्यातूनच रासेभोसे, चाकण येथील ग्रामस्थांनी ‘अमोलदादा, तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत!’ असे उपरोधिक बॅनर लावल्याचे दिसले. त्यानंतर आता कोल्हेंना थेट विचारणाच शिरूर तालुक्यात झाली.

कोल्हे शिरूर तालुक्याच्या गावभेट मंगळवारी दौऱ्यावर होते. करंदी गावात त्यांचे शाल देऊन स्वागत झाले. त्यावेळी एका गावकऱ्याने व्यासपीठावरच त्यांना ‘पाच वर्षे झाली, करंदी गावासाठी काय केले, हे आपण आपल्या भाषणात सांगावे,’ अशी आवाहनवजा सूचना केली. त्याला थेट उत्तर न देता, “आपल्या अगोदरच्या खासदारांनी (आढळराव) दहा वर्षांत एक पत्रकार परिषद घेतली नाही,” असा आरोप कोल्हेंनी भाषणात केला.

“मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात अनेक वेळा शिरूरमध्ये येऊन गेले. केंद्रीय मंत्रीही येतील,’ असे सांगत करंदी गावासाठी ‘पाच वर्षांत काय केले,” या मूळ प्रश्नाला मात्र कोल्हेंनी खुबीनं बगल दिली.

 

दरम्यान, अशोक पवार हे शिरूरचे आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. त्यांच्याच तालुक्यात कोल्हेंना करंदी ग्रामस्थांनी वरील जाब विचारला. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या गावाने गतवेळी 2019 ला कोल्हेंना लीड दिले होते.

करंदी व रासेभोसे गावाअगोदर हडपसर विधानसभा मतदारसंघातील वाघोलीकरांनीसुद्धा कोल्हेंविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हेंच्या वक्तृत्वाचा काहीच फायदा आपल्याला झाला नसून, त्यांनी आपल्या कामाचा हिशेब देण्याची मागणी वाघोलीतील वॅको या एनजीओने करीत कोल्हेंना प्रथम अडचणीत आणले होते.