पुणे

“पुण्यातील अधिकृत व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी – महापालिका आयुक्तांकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी”

मुंबई येथे बेकायदेशीर होर्डिंगमुळे घडलेल्या घटनेत 16 जणांचे जीव गेले आहेत. तसेच अनेक नागरिक गंभीर स्वरूपात जखमी देखील आहेत. या सर्व गोष्टींकडे पुणे महानगरपालिकेने देखील लक्ष केंद्रित करावे व भविष्यात अशी दुर्दैवी घटना पुण्यात घडू नये. यासाठी शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास निवेदन देत आहोत. पुण्यामध्ये देखील होर्डिंग पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातही काही लोकांनी जीव गमावला आहे, असे होउन देखील पुण्यामध्ये होर्डिंगवर कोणतेही कायदेशीर निर्बंध आले नाहीत व प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भ्रष्टाचार हेच आहे. आपल्या म्हणण्यानुसार पुण्यामध्ये हडपसर, मुंढवा, औंध भागात अनधिकृत होर्डिंग आहेत अशी आपण माहिती दिली. परंतु यापेक्षा जास्त बेकायदेशीर होर्डिंग पुणे शहरामध्ये आहेत. याकडे आकाश चिन्ह विभागातील व अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात व करीत आले आहेत.

 

पुणे शहरामध्ये 2598 होर्डिंग्ज अधिकृत असल्याची माहिती आपण प्रसार माध्यमात दिली आहे. परंतु यातील बहुतेक होर्डिंग्ज हे पूर्णपणे नियमानुसार लावण्यात आलेले नाहीत. इमारतीच्या बांधकामाला उंचीबाबत नियमावली व निर्बंध आहेत. मग होर्डिंग जरी अधिकृत असतील तर त्याला उंचीची नियमावली व निर्बंध का नाही ? यातील कित्येक होर्डिंग अशा ठिकाणी आहेत की भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इमारत कमकुवत झाल्याने पडले, तर रस्त्यावरच पडू शकतात. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. अशा होर्डिंगला देखील अधिकृत करण्यात आले आहेत. होर्डिंग ज्या जागेमध्ये आहेत ती जागा रस्त्याच्या आत मध्ये असली पाहिजे, जेणेकरून होर्डिंग पडल्यानंतर रस्त्यावर अथवा रहदारी असणाऱ्या लोकांवर पडू नयेत. या नियमाकडे अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

 

होर्डिंगचे स्ट्रक्चर बनविताना देखील चुकीच्या पद्धतीने बनवण्यात येते, याकडे लक्ष देणे गरजेचे वाटते. सध्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी एकमेव अधिकारी काम करीत आहे. त्यामुळे मनमानी पध्दतीने रिपोर्ट तयार होत आहेत. पुणे शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. कमीत कमी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असावी व त्यामध्ये पुणे शहरा बाहेरील तज्ञ अधिकारी देखील समाविष्ट करण्यात यावे. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर दुर्घटना झाली त्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. त्यामुळे ते आपले काम जबाबदारीने नियमाने व कायदेशीर पद्धतीने करतील. आपण म्हणत असलेल्या 2598 अधिकृत होर्डिंगची देखील तपशीलवार माहिती जसे होर्डिंग्जची साईज, त्याची हाईट व त्याचे झालेले ऑडिट, तसेच होर्डिंग्जचे रस्त्यापासून असलेले अंतर याची सर्व माहिती आम्हाला मिळावी व सर्वसामान्य जनतेसाठी प्रसिध्द करण्यात यावी.