पुण्यात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव पुढे आलं आहे. या अपघाताप्रकरणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर आमदार सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट) यांचा दबाव होता असा आरोप केला जात आहे. पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसानी योग्य पद्धतीने कारवाई केली नसल्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली असतानाच आमदार सुनील टिंगरेंमुळे ही कारवाई नीट झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन प्रश्न विचारले आहेत.
अंबादास दानवे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आमदार सुनील टिंगरे सांगतात की, त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला नाही. खरंतर हा शेंगा खाऊन टरफल लपवण्याचा प्रकार आहे. तुमचा दबाव नव्हता असं तुम्ही म्हणत असाल तर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या. १. तुम्ही (आमदार सुनील टिंगरे) मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेला होतात? २. एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी किती वेळा असे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचला आहात? ३. अनेकदा अशा प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते, मात्र तुम्ही थेट पोलीस ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेला होतात?” दानवे म्हणाले, खरंतर या प्रश्नांची उत्तरं अजित पवार यांनी द्यायला हवीत.
आपली बाजू मांडताना सुनील टिंगरे काय म्हणाले?
आमदार सुनील टिंगरे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, “कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी मी आशा बाळगतो. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना समाजमाध्यमांवर काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत केली जात आहे. मी सुरवातीला याकडे दुर्लक्ष केलं. परंतु, विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मला माझी भूमिका मांडणं आवश्यक आहे.
सुनील टिंगरे म्हणाले, “माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती मला १९ मे रोजी पहाटे ३ च्या सुमारास मिळाली. त्यापाठोपाठ माझ्या परिचितांनी (अल्पवयीन आरोपीचे वडील) मला फोन केला. त्यांच्या मुलाचा अपघात झाल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो.