पुणे

“पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीचा डाग पुसून टाका… प्रमोद नाना भानगिरे यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे शहर सुन्न पडले आहे. रात्री उशिरा पब व बारमधून मद्यधूंद अवस्थेत तरुणाई बाहेर पडते आणि बेधुंदपणे वाहने चालवल्यामुळे असे प्रकार घडतात असे उघडकीस आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व अनधिकृत पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत अशी विनंती पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व पुणे महानगर पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

 

पुणे शहर व जिल्हयातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करण्याबाबत महोदय, आपणांस या पत्राद्वारे विनंती करण्यात येते की काहीच दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाकडून बेदरकार पद्धतीने वाहन चालवित अपघात केल्यामुळे पुणेकर सुन्न झाले आहेत. पार्लर याला हुक्का पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, बार व कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील तरुणाई मोठ्‌या संख्येने याला बळी पडत असून मद्यधुंद अवस्थेत पब व बार मधून बाहेर पडतांना अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहर व जिल्ह्याचे समाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी व पुणे शहराचे नावलौकिक शिक्षण, संशोधन व सांस्कृतिक राजधानी हाच असावा याकरिता शहरातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यात टाकणाऱ्या या पब व हुक्का पार्लर संस्कृतीला तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे शहरात भान हरवून वावरणाऱ्या दिशाहीन तरुण पिढीला शिस्त लागावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

 

बेकायदा पब – हुक्का पार्लरमुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन
पब व हुक्का पार्लर मध्ये अल्पवयीन मुलांचे जाण्याचे प्रमाण जास्त असते, यातून गुन्हेगारी वाढते गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी असे बेकायदा पब हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद केल्यास पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण येईल.
प्रमोद नाना भानगिरे – शहरप्रमुख शिवसेना