हडपसर
आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत आणि विसावा हा हडपसर येथे असतो .या दोन्ही पालखी सोहळात पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असा सूचना आमदार चेतन तुपे पाटील यांनी पोलीस व महापालिका प्रशासनाला दिल्या.तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा ज्याप्रमाणे मंडपात असतो. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी विसाव्यासाठी तसाच स्वरूपाचा भव्य मंडप विसाव्याशेजारी उभारण्यात येणार असून तेथूनच भाविकांना सुलभ दर्शन देण्याचे नियोजन करावे, असेही आमदार तुपे यांनी प्रशासनाला आवर्जून सुचवले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हडपसर येथील साने गुरुजी भवन येथे
पालखी सोहळा स्वागत नियोजन बैठक झाली. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजन महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक मोरे महाराज, संतोष महाराज मोरे, संजय मोरे महाराज, वैशाली बनकर, सुनील बनकर, नंदा लोणकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, सुभाष पावरा , डॉ.दिनेश भेंडे , डॉ.स्नेहल काळे, संजय घनवट , डॉ.शंतनु जगदाळे, मनोज घुले, अमर तुपे ,माऊली कुडले, योगेश गोंधळे, वैष्णवी सातव,भारती तुपे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांनी सांगितले की महानगर पालिकेचे विविध विभागांचे ५५ अधिकारी, ८५९ सेवक पालखी सोहळा स्वागतापासून ते सोहळा महापालिका हद्दी बाहेर मार्गस्थ होईपर्यंत नेमून दिलेली काम करणार आहेत.४४ ठिकाणी २७० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे कंटेनर ,निर्माल्य कलश आणि २० घंटा गाडी ठेवण्यात येणार आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात औषध फवारणी केली जाणार आहे. पालखी सोहळा दरम्यान हडपसर मधील २८ खासगी रुग्णालयात वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय २१ अम्ब्युलन्स ठेवण्यात येणार आहेत.पालखी रथाला तसेच धोकादायक असणाऱ्या झाडांच्या फांद्या काढणे आणि रस्ते व पदपथावर असलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
पालखी सोहळा व दिंड्या पुढे जाण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करून द्या; पालखी सोहळा विसाव्यावर अर्धा तास जास्त थांबवता येईल.
*मगरपट्टा उड्डाणपूल ते गाडीतळ विसावा व त्यापुढेही वारकऱ्यांच्या दिंड्या चालण्यासाठी येथील भाविक अतिशय कमी जागा ठेवतात त्यामुळे दिंड्यांना अगदी सावकाश चालावे लागते .त्यामुळे विसाव्याच्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही. भाविकांनी व प्रशासनाने मोठा रस्ता उपलब्ध करून दिला .तर, विसाव्याच्या ठिकाणी अर्धा तास जास्तीचा विसावा देऊन भाविकांना दर्शन उपलब्ध करून देता येईल, असे भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले.
अन्नप्रसाद व फराळाचे वाटप करण्यापेक्षा देशी वृक्षांची लागवड करा
माणिक महाराज मोरे म्हणाले की पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यापेक्षा आपण देशी वृक्षाची लागवड केली तर, वारकऱ्यांना चिरंतर सावली मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे अन्नप्रसाद वाटप करण्यापेक्षाही आपण वृक्षारोपण करावे ,तसेच प्लास्टिक मुक्तवारी करावी. कोणा भाविकाला अन्नप्रसाद किंवा फराळाचे वाटप करायचे झाले. तर प्रत्येक दिंडीचा जे कोणी विणेकरी असेल त्या विनेकार्याकडे त्याचे वाटप करावे जेणेकरून विसाव्याच्या ठिकाणी दिंडीतील सर्व वारेकऱ्यांना ते मिळू शकेल.
फोटो ओळी