पुणे

“राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मागणीनंतर शिवसेनेकडूनही शहरात सहा जागांची मागणी, विधानसभा निवडणुकीत जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहरातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर दावा केला असतानाच आता त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही सहा जागांची मागणी केली आहे. अद्याप काँग्रेसने आपली जागांबाबतची भूमिका स्पष्ट केली नसली तरी पुण्यातील मतदारसंघावरून आघाडीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 

पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत प्रत्येकी चार मतदारसंघ या दोन पक्षांकडे होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्षाचाही समावेश असणार आहे. त्यामुळे कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सहा मतदारसंघांत पक्षाची ताकद असल्याने त्यांची मागणी प्रदेशकडे करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर आणि पर्वती या मतदारसंघांचा समावेश आहे.

पुणे शहरामध्ये शिवसेनेची असलेली संघटनात्मक बांधणी आणि त्यायोगे पक्षाची पुणे शहरात वाढलेली ताकद व जनाधार याचा प्रामुख्याने विचार करून तसेच पूर्वी पुणे शहरांमध्ये शिवसेनेचे चार आमदार निवडून आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून असणारी विकास कामांची अपेक्षित खात्री आणि विश्वास. अशा अनेक जमेच्या बाजूंचा आढावा आठही विधानसभा क्षेत्रानुसार चर्चा करून घेण्यात आला. कोथरूड, पर्वती, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावे असे वरिष्ठांना दिलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे. बैठकीला पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर, शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर, पुणे संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, शालिनी देशपांडे, सहसंपर्कप्रमुख आदित्यजी शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, राजेंद्र काळे, विजय देशमुख, तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसच्या जागांवर सुद्धा पवार ठाकरे गट आग्रही…

आघाडीच्या काळात कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर या जागा काँग्रेसकडे होत्या. त्यामधील पुणे कन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांवर राष्ट्रवादी पवार पक्षाने, तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट या जागांची सेना ठाकरे पक्षाने मागणी केली आहे. यात कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागांवर ठाकरे आणि पवारांनी केलेल्या दाव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जास्त सहा जागांची मागणी…
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद जास्त असल्याने मागील निवडणुकीत चार जागा आमच्या हक्काच्या लढवल्या होत्या त्यामुळे अधिकच्या दोन जागा मिळून आम्हाला सहा जागा लढवायच्या आहेत याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर केला आहे.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष