पुणे

“शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महादेव बाबर शड्डू ठोकणार, हडपसर विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला? पुण्यातील शिवसेना नेत्यांची मुंबईत फिल्डिंग…

पुणे / हडपसर (अनिल मोरे )
दोन वेळा विधानसभेचे आमदार, दोन वेळा लोकसभेचे खासदार, तब्बल 11 नगरसेवक ज्या शिवसेनेचे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्या हडपसर विधानसभा मतदारसंघातून यंदा विधानसभेला शिवसेनेकडून महादेव बाबर यांनी शड्डू ठोकला आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी नेत्यांनी मुंबईत फिल्डिंग लावली आहे, लोकसभेत मिळालेल्या यशानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीचा आमदार निवडून येण्याची शक्यता वाढल्याने महाविकास आघाडीत प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याची चिन्हे आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात चांगलाच यशस्वी झाला  अपेक्षेपेक्षा जास्त यश पुणे जिल्ह्यात सहभाग पश्चिम महाराष्ट्रात मिळाले, पुणे जिल्ह्यातील बारामती शिरूर या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या त्यात शिरूर मधून डॉ.अमोल कोल्हे एक लाख 40 हजारहुन अधिक मतांनी निवडून आले त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघातून सुमारे 14 हजार मतांची आघाडी मिळाली, मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील या शिवसेनेच्या उमेदवाराला हडपसर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य होते, शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर व शिवसेनेच्या निष्ठावंत माजी नगरसेवकांनी डॉ.अमोल कोल्हे यांचे निष्ठेने काम केले, शिवसेनेचे नेते असलेले माजी आमदार महादेव बाबर यांनी नगरसेवक पदापासून आपली कारकीर्द सुरुवात केली महापालिकेत उपमहापौर पद, विरोधी पक्षनेते व विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्र्यांना पराभूत करत आमदार झाले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी हडपसर मध्ये शिवसेनेची चांगली बांधणी केली आजवर या मतदारसंघातून 11 नगरसेवक निवडून आले आहेत त्यातील प्रमोद नाना भानगिरे यांनी शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने ते शहरप्रमुख झाले, त्यांच्या व्यतिरिक्त या मतदारसंघातून एकही माजी नगरसेवक शिवसेना सोडून गेला नाही, त्यामुळे हडपसर मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना अभ्येद्य राहिली,

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी शिवसेना संपवण्याचे वक्तव्य केल्याने युती धर्म बाजूला सारून माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांचे काम केले टिळेकर यांचे पारडे जड असताना अवघ्या 2800 मतांनी चेतन तुपे यांचा विजय झाला या विजयात शिवसेनेचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याने त्यांच्याबद्दलही मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नुकतीच मुंबईमध्ये शिवसेना पुणे शहर नेत्यांची व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये शहरप्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी आग्रह धरला, त्यामुळे हडपसर मतदार संघ शिवसेनेकडेच राहावा म्हणून पुणे शहरासह हडपसर मधील नेत्यांनी मुंबईत चांगलीच फिल्डिंग लावली आहे. याचा निर्णय महाविकास आघाडीतील सर्व नेते करणार आहेत.

 

“हिंदूंचा महादेव मुस्लिमांचा बाबर, हडपसरच्या राजकारणातील स्लोगन…
मुस्लिम बहुल भागात महादेव बाबर यांनी अनेक वर्ष नेतृत्व केले आहे शिवसेनेत असतानाही त्यांचा मुस्लिम बांधवांशी चांगला जनसंपर्क आहे, मुस्लिमांच्या सुखदुःखात ते हिरीरीने सहभाग घेत असतात, त्यामुळे या मतदारसंघातील लोक त्यांना हिंदूंचा महादेव व मुस्लिमांचा बाबर असे प्रेमाने म्हणतात. दहा वर्षांपूर्वी पराभूत झाले तरी महादेव बाबर यांनी कात्रज पासून मांजरी पर्यंत आपला जनसंपर्क कायम ठेवल्याने त्यांच्याविषयी मतदार संघात सहानभूती जास्त आहे.

“विद्यमान आमदारांविषयी नाराजी निवडणुकीत भोवणार…
मागील पंचवार्षिक निवडणुकीत महादेव बाबर व शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांचे मतदारसंघात उघडपणे काम करून त्यांना निवडून आणले होते, निवडून आल्यावर शिवसेनेला विश्वासात न घेता कोंढव्यात जाऊन, शिवसेनेच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत नाराजी आहे त्यातच पाच वर्षे आमदारकिची संधी मिळूनही मतदारसंघात भरीव कामगिरी करता न आल्याने त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे याचा फायदा उचलण्याच्या मनस्थितीत शिवसैनिक आहेत.

 

महाविकास आघाडीतील जागा वाटपात हडपसर मतदारसंघ निर्णायक…
महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस व शिवसेनेने दावा केला आहे, जागावाटपात हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, यावर पुढील राजकारण अवलंबून असून माजी आमदार महादेव बाबर यांनी मतदारसंघ राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.