पुणे

इंधन चोरी प्रकरणी इंधन माफिया प्रविण मडीखंबे सह त्याचे ७ साथीदार तडीपार प्रतिनीधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलियन पदार्थांची चोरी करणाऱ्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील इंधन माफियांच्या टोळीप्रमुख प्रविण मडीखांबे याच्या सह त्याच्या’ ७ साथीदारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनचोर टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याचेसमवेत त्याच्या टोळी साथीदार विशाल धानाजी धायगुडे (वय ३१, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), बाळु अरुण चौरे (वय ३० रा. सिद्राममळा, लोणी काळभोर पुणे), इसाक इस्माइल मचकुरी (वय ४२, रा. संभाजीनगर तारा हाइट्स, लोणी काळभोर, ता. हवेली), संकेत अनिल शेंडगे (वय २९, गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, पुणे), राजु तानाजी फावडे (वय ३२, रा. तुळजाभवानी मंदीराशेजारी, कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे.), नवनाथ बबन फुले (वय ४१ रा. सिद्राममळा, रामदरा रोड लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) व आतीश शशिकांत काकडे वय ३१ वर्षे, रा. कोळपे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आळंदी म्हातोबाची(ता.हवेली)हद्दीतील डोंगर भागात २५ जुलै रोजी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची
सातारा जिल्ह्यात जाणारी जमिनी खालील पाईपलाईन फोडून
इंधनचोरी झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आरोपींनीही याबाबतची पोलिसांना कबुली दिली होती. लोणी काळभोर पोलिसांनी चोरीच्या पेट्रोलची विक्री करुन आलेले रोख १० लाख रुपये व चोरीतील २४ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांवर अशा प्रकारचे १० पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

 

कायद्याची वचक बसावी म्हणून प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांवर लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता. पोलीस उपायुक्त आर राजा यांनी आरोपींच्या तडीपारीच्या प्रस्तावाला मान्यता देऊन आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) क्र. ५५ प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये प्रविण मडीखांबे व इसाक मचकुरी यांना प्रत्येकी २ वर्षे, नवनाथ फुले याला १८ महिने, तर विशाल धायगुडे, बाळु चौरे, संकेत शेंडगे, राजु फावडे व आतीश काकडे यांना प्रत्येकी १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

 

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस हवालदार संदीप धनवटे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.