पुणे

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, दोषींवर कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून दोन्ही मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 10 लाख देणार

मुंबई :- पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना पुन्हा सावरता यावे यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही शिंदे यांनी घेतला आहे.

 

पुण्यात झालेल्या या घटनेनंतर यातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचे या दोघांच्या वडिलांनी आणि कुटूंबियांनी मान्य केले. तसेच आपल्याला भेटून आपले म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.