पुणेमहाराष्ट्र

“पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक…

पुणे शहरात अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून कधीकाळी विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे आता ड्रग्जचे माहेरघर म्हणून देशात ओळखले जात आहे. छोट्या मोठ्या हॉटेल्स, बार मध्ये खुलेआम अमली पदार्थ मिळतात, मात्र केवळ गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. तसेच, कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत. कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. ड्रग्स माफियांना, गुन्हेगारांना अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त आहेत.

 

अशा स्वार्थी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी व महाराष्ट्रातील अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजी नगर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी “पालकमंत्री उत्तर द्या, गृहमंत्री उत्तर द्या, 50 खोके एकदम ओके, 50 खोके कोयता गँग ओके, 50 खोके ड्रग माफिया ओके, गृहमंत्री राजीनामा द्या, उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या, मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता.

 

सरकारकडून येत्या काही दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास शहरात एकच वेळी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उदय महाले, राजीव साने, दिलशाद शेख, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, स्वप्निल जोशी, जयदीप देवकुळे, राजश्री पाटील, पोपट खेडेकर, स्वाती चिटणीस, सुषमा सातपुते, सुनील पडवळ, नितीन कदम, वंदना मोडक, गणेश नलावडे, स्वाती पोकळे, काकासाहेब चव्हाण उपस्थित होते.