पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज)
भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. २०१९ च्या निवडणुकीनंतर अखेर हा वनवास संपला असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच मागील विधानसभा निवडणुकीत हडपसर मधून पराभूत झालेले योगेश टिळेकर यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. यानिमित्ताने ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. पक्षश्रेष्ठींना शिफारस करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारविनिमय सुरू होते. राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह दानवे, फुके, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय केला जात होता. त्यानुसार, आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ.परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानपरिषद देऊन योगेश टिळेकर यांचे पुनर्वसन…
मागील विधानसभा निवडणुकीत हडपसर मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांच्याकडून योगेश टिळेकर यांना पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले व अजित पवारांचा गट भाजपबरोबर गेल्याने ही जागा अजित पवार गटास सुटण्याची शक्यता जास्त होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले योगेश टिळेकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून भाजपने विधानपरिषद देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.
महायुतीतील उमेदवारीची स्पर्धा झाली कमी…
महायुतीकडून हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार चेतन तुपे, भाजप कडून योगेश टिळेकर व शिवसेना शिंदे गटाकडून प्रमोद नाना भानगिरे निवडणुकीसाठी इच्छुक होते परंतु टिळेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने तुपे व भानगिरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस असणार आहे.