मुंबई

“वसंत मोरे यांची वंचितला सोडचिट्ठी, उद्धव ठाकरे यांची घेतली भेट, शिवसेनेतील प्रवेशाचा मुहूर्त ठरला, खडकवासला कि हडपसर विधानसभा लढविणार अजून गुलदस्त्यात…

मुंबई : मनसेला जय महाराष्ट्र करुन लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले महाराष्ट्र पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच संजय राऊत यांनी वसंत मोरेंना फोन करुन शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेवारीची खात्री नसल्याने त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. आता, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही समजते. पुढील आठवड्यात 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. वसंत मोरे यांनी मनसेत वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता. यावेळी, राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी मनसे सोडल्याने ते शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे, ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात, असेही बोलले जात. मात्र, ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे, त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन आपली पुढील राजकीय वाटचाल नव्याने सुरू केली होती. मात्र, निकालानंतर महिनाभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेची कास धरल्याचं दिसून आलं.

 

वसंत मोरे विधानसभा लढवणार…
आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल. मी वंचित मध्ये गेलो होतो. मात्र, मतदारांनी मला स्वीकारलं नाही. या अगोदर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ असेही मोरेंनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले. मला दोन पर्याय आहेत, खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून मी विधानसभा लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता, तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत, असेही मोरेंनी म्हटले.

 

पुण्यातून लोकसभेत अपयश आले हाती …
मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण, त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. वसंत मोरेंना लोकसभा निवडणुकीत केवळ 32,012 मतं मिळाली आहेत.

खडकवासला कि हडपसर विधानसभेच्या रिंगणात…
वसंत मोरे यांनी मनसेच्या चिन्हावर दोन वेळा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, दोन्ही वेळा त्यांना अपयश आले होते, हडपसर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रशांत जगताप यांची दावेदारी आहे तर शिवसेनेतून माजी आमदार महादेव बाबर इच्छुक आहेत, हडपसर व खडकवासला मतदारसंघासाठी शरद पवार आग्रही आहेत, प्रशांत जगताप पवार कुटुंब व पक्षात निष्ठावंत मानले जातात, खडकवासला मतदारसंघात वसंत मोरे यांना संधी मिळू शकते या मतदारसंघातून ते निवडून पण येऊ शकतात, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मान्यता देऊ शकते.