कोकण विभाग

सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प म्हणत आ. शेखर निकम यांनी केली कोकणसाठी विकासनिधीची मागणी

चिपळूण : कोकणवासीयांचे लाडके आणि कार्यक्षम आमदार शेखर निकम यांनी अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला पाठींबा देत त्यांचे कौतुक केले व पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निधीची मागणी करत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.

 

महायुतीच्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी बोलत असताना हा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प असून यामध्ये माता-भगिनी, बालक-युवा, शेतकरी-उद्योजक वर्गासोबत बचत गट, पशुसंवर्धन, पर्यावरण, जलसिंचन, युवा प्रशिक्षण त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्याबाबतीत घेतलेले महत्त्वकांक्षी निर्णय तसेच उच्च शिक्षण, पर्यटन, दिव्यांग, तृतीयपंथी, जन आरोग्य, गिरणी कामगार, शहरातील पायाभूत सुविधा, अध्यात्म व सांप्रदाय अशा अनेक घटकांना या अर्थसंकल्पामध्ये स्थान दिल्याचे व खूप चांगले लाभ देणारे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. महायुतीच्या सरकारने महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ ही कल्याणकारी योजना आणली त्याबद्दल निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा अर्थसंकल्प सर्वधर्म समावेशक असून विरोधकांनी धर्माला किंवा काही समाजाला या अर्थसंकल्पामध्ये न्याय दिला नाही असा गैरसमज पसरविला आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आपल्या कोकणवासीयांच्या विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगत निकम यांनी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग मधील एकमेव सायन्स अँड इनोव्हेटिव्ह बाल विज्ञान केंद्रामध्ये केंद्र व विज्ञान विषयक वाचनालय उभारणीसाठी सहाय्य द्यावे, अटल बांबू समृद्धी योजनेद्वारे नंदुरबार जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीने विशेष अनुदान दिलं जातं त्याच पद्धतीने जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यासाठी देखील लाभ दिला तर कोकणामध्ये देखील भूस्खलन होतं, अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने जी बेसुमार वृक्षतोड होते त्या वृक्षतोडीला त्याचा उपयोग होईल आणि त्यापासून जमिनीची धूप देखील थांबू शकते. ही योजना जशी बांबूची आहे तशी खैऱ्याच्या लागवडीला लागू करावी, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये फणस संशोधन केंद्राचा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चाळीस कोटीचा जो आमचा प्रस्ताव आलाय त्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, कोकणातले देखील गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, तसेच कोकणात नमन होतात, खेळ होतात, भारुड होतं त्यातील कलाकारांना मानधन देण्यात यावे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून ३२०० कोटीचा विकास आराखड्याप्रमाणे चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, राजापूर येथे देखील सातत्याने पूर येत असल्याने पूर नियंत्रणासाठी काही निधी उपलब्ध करून दिला तर ही शहरे देखील पुरापासून वाचवता येऊ शकतील, सिंचन प्रकल्पांतर्गत पाइपलाइन माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था कालव्याच्या माध्यमातून करावी, कोकणामध्ये धनगर अतिशय ग्रामीण भागात, डोंगराळ भागात राहतात त्यांचं पुनर्वसन करणे खूप गरजेचे आहे, कित्येक किलोमीटर रस्ता नाही त्याबाबतीतही विचार करावा, राष्ट्रीय आरोग्य अभियंताच्या कार्यरत गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीचा परतावा करावा आणि २००१ मध्ये परवानगी दिलेली जी वरिष्ठ महाविद्यालये आहेत त्यापैकी ७८ महाविद्यालयांचे मूल्यमापन केले आहे त्यांच्या बाबतीत अनुदानाचा विचार करावा इ. विकासकामांचा आराखडा मांडला.