पुणे

चिपळूणची लाल-निळी पूररेषा काढून शहराचा खोळंबलेला विकास मार्गी लावावा – आ. शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

मुंबई (प्रतिनिधी) :- चिपळूण शहराला लावण्यात आलेली लाल-निळी रंगाची पुररेषा त्वरीत काढून चिपळूण शहराचा खोळंबला विकास मार्गी लावावा. याविषयी गेले वर्ष-दीड वर्षे पाठपुरावा करून देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात करून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील अनेक प्रश्न उपस्थित केले.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात गेल्या दोनच दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची नळपाणी योजनेसाठी सुमारे १६० कोटी रुपयांच्या तांत्रिक मान्यता मिळाल्याने सरकारचे आभार मानले व याला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळावी अशी मागणी केली. तसेच देवरुख शहरासाठी देखील नळ पाणी योजनेला मंजुरी मिळावी, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

गेल्या १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामात सातत्याने अडचणी येत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामांमध्ये विशेष लक्ष घातले असल्याने काही कामे मार्गी लागली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली. यामुळे पेढे गावातील रहीवाशांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न गंभीर बनला आहे. तरी परशुराम घाटात गॅबियन वॉल उभारण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून येथील ग्रामस्थांच्या सुरक्षितेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच कशेडी बोगद्यातील गळतीचा विषय समोर आला असून याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे.

सातारा- रत्नागिरी, संगमेश्वर-पाटण रस्ता होण्याच्या दृष्टीने डीपीआरसाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला असून या कामाला देखील चालना मिळावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी करून एकंदरीत चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. आमदार निकम यांनी गेल्या काही दिवसात चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास करून सभागृहाचे लक्ष वेधल्याने चिपळूण-संगमेश्वर येथील रहीवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.