महाराष्ट्र

खासदार डॉ. अमोल कोल्हे ‘इन अॅक्शन’ जुन्नरच्या प्रशासकीय आढावा बैठकीत ५ तास घेतली झाडाझडती

नारायणगाव – जल जीवन मिशन माध्यमातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या अहवालात एकही योजना निकषानुसार नसल्याचे आढळून येताच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या योजनेतील सर्व कामांची चौकशी करण्याचे निर्देश देत आक्रमक पवित्रा घेतला. जुन्नर तालुक्यातील सर्वच विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांच्या आढाव्याची बैठक खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

लोकसभेत विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात जनता दरबार आणि आढावा बैठकांचा धडाका लावला असून काल (दि. ११ रोजी) जुन्नर तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेली बैठक तब्बल ५ तास चालली. या बैठकीला जुन्नरचे तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपवनसंरक्षक, आदिवासी प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कृषी, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण यासह विविध विभागांचे प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, पुरातत्व विभाग, बीएसएनएल, महावितरण, भूमि अभिलेख, दुय्यम निबंधक, कार्यकारी अभियंता डिंभे धरण विभाग व कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१, सामाजिक वनीकरण, नारायणगाव व जुन्नर एस.टी. आगारप्रमुख आणि जुन्नर, आळेफाटा, ओतूर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत जलजीवन मिशनचा आढावा श्री. मिलिंद रोकडे यांनी सादर केला. त्यात एकही योजना निकषाला धरून नसल्याचे आढळून आले. सर्व्हेक्षणापासून ते निविदा प्रक्रिया, मटेरियल एजन्सी, तांत्रिक बाबी, दर्जा यासह सर्वच बाबींची चौकशी करण्याची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे करणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. आजच्या बैठकीत सर्वच विभागांच्या विकासकामे व योजनांची झाडाझडती घेताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेली कामे दर्जेदार झाली आहेत का असा प्रश्न उपस्थित करुन सर्व कामांची दर्जा तपासणी करुन दर्जा न राखलेल्या कामांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाने रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांच्यावरील उपचारात कुठलीही कसूर राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या.

आजच्या प्रशासकीय आढावा बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्येक विभागाची अत्यंत बारकाईने माहिती घेतली. यावेळी विविध विभागांनी सादर केलेल्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवून कामांमध्ये दर्जात्मक सुधारणा झाली पाहिजे अशी ताकीद दिली. या आढावा बैठकीनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी आपण यापुढील काळात सातत्याने कामांबाबत आढावा बैठका घेणार असून सर्वच अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व तालुक्याच्या विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे असे आवाहन केले.

चौकट
तालुक्यातील संवेदनशील विषय असलेल्या बिबट प्रश्नी वनविभागाकडून होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना राज्य आपत्ती घोषित झाली तर त्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असतील याची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यात लाँग टर्मचा विचार करुन उपाययोजना असाव्यात अशी सूचना केली. तसेच बिबटप्रवण क्षेत्रात पिंजरे वाढविण्याबरोबरच माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढविण्यात यावी असे सांगितले. मानव-बिबट संघर्ष वाढू नये यासाठी समतोल राखणे आवश्यक आहे याचा विचार करुन उपाययोजना असाव्यात. तसेच जनजागृती, समुपदेशन शिबीरे घेऊन नागरिकांमध्ये असलेली भीती कमी करण्याचे, तसेच त्यांनी काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन वनविभागाने करावे. बिबटप्रवण क्षेत्रात सौर दिवे बसविण्याच्या प्रस्तावाचा विचार व्हावा अशा सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केल्या.