प्रतिनीधी -स्वप्नील कदम
लोणी काळभोर : कदमवाक् वस्ती येथील संभाजीनगरमधे रहात असलेल्या दहावीत शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्रीविहार वसाहतीत घडली आहे. गोविंद सतीश रुपनवर, (वय – १५, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरामध्ये आई, वडील, बहिण मुलगा असे चौघेजण असणाऱ्या श्री विहार वसाहतीमध्ये राहतात. मागील एक महिन्यांपूर्वीच लातूरवरून सहकुटुंब कदमवाकवस्ती येथे राहण्यासाठी आले आहेत. तर गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीसाठी प्रवेश घेतला होता.
दरम्यान, कदमवाकवस्ती परिसरात राहत असलेल्या मामाकडे गोविंद, त्याची आई, व बहिण हे तिघेजण रविवारी (दि. १४) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते.यावेळी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी रात्री गोविंद अभ्यास करायचा आहे, मी घरी जातो असे म्हणून मामाच्या घरातून निघून आला. त्यानंतर गोविंदची आई आणि त्याची बहिण या दोघीही पाठीमागून घरी आल्या. त्यांनी वारंवार दरवाजा वाजवला., मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून गोविंद झोपला असेल या कारणाने गोविंदची आई त्यांची बहिण राहत असलेल्या ठिकाणी झोपण्यासाठी गेल्या. सकाळी परत घरी आल्या असता पुन्हा दरवाजा वाजवला, तरीही गोविंदने दरवाजा उघडला नाही.. त्यामुळे त्यांनी एका कारागिराला बोलावून दरवाजा तोडला असता गोविंद याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ नागरिकांच्या मदतीने खाली घेतले. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. दरम्यान, याबाबत लोणी काळभोर पोलिसांनाही खबर देण्यात आली होती, त्यानुसार घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ईश्वर भगत व नितेश पुंडे,योगेश कुंभार हे दाखल होत त्यांनी पंचनामा केला.